पुणे : पुणे येथील चांदणी चौक उड्डाणपुलाचे लोकार्पण, खेड बायपास, पुणे बायपास व एकलहरे मार्गांचे चौपदरीकरण तसेच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे’ मेट्रो कार्डचे लोकार्पण कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान पुणे मेट्रोनं प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात प्रस्तावित मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या कामाला गती देतानाच शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाचा वेग वाढवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याच्यादृष्टीने प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जागा, खासगी जागांबाबत सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका तसेच पोलीस वाहतूकांनी समन्वयाने वाहतुकीचे नियोजन करावे.