बारामतीत 'भिलवाडा पॅटर्न' राबविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश; शहर आजपासुन सील
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 07:55 PM2020-04-09T19:55:38+5:302020-04-10T11:48:27+5:30
बारामती शहरात गुरुवारी कोरोना रुग्णाचा पहिला बळी..
बारामती : बारामती शहरात गुरुवारी(दि ९) कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. शहरात भिलवाडा पॅटर्न राबविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत.त्यामुळे संपुर्ण शहर सीलबंद करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता एकही वाहन शहरात सोडले जाणार नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे,सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थिीतीत प्रशासन भवनमध्ये आज बैठक पार पडली. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार आज मध्यरात्रीपासुनच कडक पावले उचलत बारामतीशहरात भिलवाडा पॅटर्नच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये मेडिकल,किराणा,हा नागरिकांना घरपोच होणार आहे.तर यासाठी नागरिकांना हेल्पलाईन नंबर दिला जाणार असुन यावर उपजिल्हाधिकारी व बारामती नगर परिषद याच्या देखरेखीत कंट्रोल रूम असणार आहे. यामध्ये भजोपाल,फळ,किराणा,मेडिकल यासाठी परिसर ठरवून देऊन शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत मास्क,सॅनिटायजर, सोशल डिस्टन्स यांचे पालन करून नागरिकांना ऑर्डरप्रमाणे वस्तू घरपोच करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
आज मध्यरात्रीपासून बारामती शहर व तालुक्याच्या परिसरात फिरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहर व तालुक्यातील होम क्वारंटाईन केलेल्या कुठल्याही नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आता बाहेर जाता येणार नाही. परराज्यातून आलेल्या नागरिकांसह ,बेघरांना सांस्कृतिक केंद्रात नेऊन त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कुठल्याही कारणास्तव मुलांनी रस्त्यावर क्रिकेट खेळणे,निरा डावा कालव्यात पोहायला जाणे महागात पडणार आहेत.
एखाद्या कुटुंबात एखाद्याचा मृत्यू ओढवल्यास कमीत कमी लोकांत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी. शहरात विविध बँकांचे एटीएमच्या ठिकाणी सॅनिटायजरचा वापरही आता अनिवार्य केला जाणार आहे. बँकात गर्दी होणार नाही. याबाबत बँकेने गर्दी कमी होईल,याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांच्या किमान तीनदा तपासण्या होणार आहेत.त्यासाठी आरोग्य विभागाची १६१ व ८९ पथके कार्यरत आहेत. नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना तीन महिन्यांचे धान्य पुरविण्यासाठी समन्वयाची तहसिलदार विजय पाटील यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
—————————————
...तर तो अत्यावश्यक सेवेचा पास काढुन घेणार
शहरातील अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत.मात्र,काही ठकाणी या पासचा गैरफायदा घेतला जात आहे.पासधारक घरात आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील एखादा व्यक्ति,त्याचा भाऊ पास घेवुन शहरात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे अत्यावश्यक पासाचा गैरफायदा घेणाºयांकडुन पास काढुन घेतला जाणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी लोकमतशी बोलताना दिला .
————————————————