बारामती : लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला चांगला 'झटका' दिला. म्हणतात ना..जोर..का झटका..धीरे से लगे.. तसाच 'जोर..का झटका धीरे से लगा' मात्र आता तसे काही होऊ देऊ नका. लोकसभेला तुम्ही चांगलाच झटका दिला. तो तुमचा अधिकार होता, तो तुम्ही बजावला. मात्र ही विधानसभेची निवडणूक आहे. मी तुमचा प्रतिनिधी आहे. गावच्या पुढार्यांचा राग माझ्यावर काढू नका,अशी साद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली आहे.अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील ढाकाळे, माळेगाव, कऱ्हावागज गावचा दौरा केला.यावेेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, गावच्या पुढार्यांना मी असं वागायला सांगत नाही. त्यांनी चांगलंच वागावं, ते चुकीचे वागले. हेच अजित पवारांच्या पुढे पुढे करत होते. आता अजित पवारांनाच दणका का द्यायचा असं काही करू नका. मात्र पुढे पुढे करणारे लोक उभे राहिल्यावर त्यांना काय दणका द्यायचा आहे तो द्या. त्याबाबत माझं काहीही म्हणणं नाही. पण तो राग माझ्यावर काढू नका,असे आवाहन पवार यांनी केले आहे.पवार म्हणाले की, अनेक जण मला असे सांगतात की, दादा तुम्ही इतक्या झटपट काम करता की त्याची किंमतच राहत नाही. काही जण म्हटले तहान लागायच्या अगोदरच तुम्ही पाणी देता. त्यामुळे त्या पाण्याचंही महत्त्व राहत नाही. तहान लागल्यानंतर थोड्या हालचालीनंतर पाणी भेटलं की त्याला समाधान वाटतं असं होऊ देऊ नका,अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीकरांना लोकसभेची पुनर्रावृत्ती हाेवू न देण्याबाबत साद घातली.उपमुख्यमंत्री अजित पवार ढाकाळे येथील सभेत म्हणाले ,काहींना वाटत असेल की अजित पवारांनी ‘साहेबां’ना सोडायला नको होतं. पण मी साहेबांना सोडलेलं नाही. साहेबांना सांगितलं होतं सगळ्यांचं मत होतं की सरकारमध्ये जावं. कामांना ‘स्टे’ दिला होता.त्या सरकारने तो स्टे दिला होता.मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो.तो तापच झाला होता, लोक वेड्यात काढतील. पैसे दिलेत पण पुन्हा स्टे दिला. स्टे पण उठला पाहिजे. वेळ जाऊन चालत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला होता,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षफुटीबाबत वक्तव्य केले आहे.तसेच पाच वर्षात अडीच वर्ष सत्ता मिळाली.त्यानंतर देखील बारामतीसाठी कोट्यावधींचा निधी आणल्याचा दावा उपमुख्यमंत्री पवार यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही मला चांगला 'झटका' दिला; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीकरांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 2:02 PM