पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन मुख्य सभा आता ‘ऑफलाईन’ अर्थात प्रत्यक्ष होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्षात सभा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अनुकूल असून याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली.
मागील काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या मागणीवरून महापौरांकडून राज्य शासनाकडे पत्र पाठवत मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्याबाबतची मागणी करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाकडून ही परवानगी देण्यात आलेली नाही.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार पुण्यामध्ये आलेले होते. या वेळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी पवार यांच्याकडे पालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. या वेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार हे उपस्थित होते. या मागणीचा सकारात्मक विचार करून पवार यांनी नगरसेवक अधिकारी अशा २०० लोकांच्या उपस्थितीच्या परवानगीसह पालिका सभागृहात प्रत्यक्षात मुख्य सभा घेण्यास परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
====
भाजपाकडून सोमवारी मुख्य सभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी, कॉंग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपाला ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्याची परवानगी मिळवून भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे धुमाळ म्हणाल्या.