पुणे: पुणे महापालिकेकडून बंडगार्डन येथे मुठा नदीकाठ सुधार योजनेतंर्गत काम वेगाने सुरू आहे. त्या ठिकाणचे ६ हजार वृक्ष त्यासाठी तोडले जाणार आहेत. त्याला आमचा विरोध असून, पर्यावरणाचे रक्षण करूनच कोणताही प्रकल्प व्हावा, त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केली.
महापालिकेच्या वतीने नदीचे पुनरूज्जीवन करण्याचे प्रायोगिक काम बंडगार्डन येथील एका पट्ट्यात सुरू आहे. त्यामुळे मुठा नदीच्या दोन्ही काठांवर काम सुरू झालेले आहे. या प्रकल्पावर ५ हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे येथील हजारो वृक्ष तोडावी लागणार आहेत. तसेच या नदी सुधार प्रकल्पामुळे जैवविविधता नष्ट होणार आहे. नदीप्रेमींनी अगोदर नदीत जाणारे सांडपाणी थांबवावे आणि त्यावर प्रक्रिया करावी अशी मागणी केली आहे. जोपर्यंत नदीत सांडपाणी वाहत आहे, तोपर्यंत नदीचे ब्युटीफिकेशन करून काहीच उपयोग नाही. त्याबाबत नदीप्रेमींनी आदित्य ठाकरे यांना याची माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडला. मागील आघाडीच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री होते. तेव्हा त्यांनी या परिसरातील डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी हे अभयारण्य संरक्षित करण्यासाठी आदेश दिले होते.
मुळा-मुठा नदीचे सुशोभीकरण सुरू आहे. त्याबाबत दिलेल्या परवानग्या चुकीच्या आहेत. त्यात त्रुटी आहेत. तेव्हा नदीकाठचे झाडे कापणार नाही, असे नमूद केले होते. पण आता ६ हजार झाडे कापली जाणार आहेत. हे चुकीचे असून, झाडे जपावीत अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी उचित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.