बारामती : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पूर्णक्षमतेने भरलेली रुग्णालये, रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी नातेवाईकांची घालमेल आणि आपल्याला उपचार मिळणार का या शंकेने हतबल झालेले रुग्ण ही परिस्थिती आहे.
बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णालय प्रशासन आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णालयाच्या हॉल, प्रवेशद्वाराच्या समोरील प्रतीक्षा कक्ष, आदी ठिकाणी ६० बेड तयार करून कोरोना रुग्णांना दिलासा दिला. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील आजच्या प्रकारामुळे बारामतीतील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या मुख्य उद्देशाने बारामतीत एक शासकीय मेडिकल कॉलेज, तीन नटराज असे चार कोविड केअर सेंटर, रुई आणि सिल्व्हर ज्युबिली रुगालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तर खासगी ‘बारामती हॉस्पिटल’ प्रशासनाने अधिग्रहीत केलेले डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र बारामतीत १५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने बेडचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण यांच्या टीमने तातडीने हालचाली करुन साठ बेडस, साठ बेडशीट, गाद्या यांची उपलब्धता करुन देत सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात तात्पुरता पोर्चंमध्ये कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे.
बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांना औषधोपचाराचा खर्च परवडणारा नसल्याने अनेक जण सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. आज रुग्णालयातील सर्वच बेड रुग्णांनी व्यापलेले असताना अचानक जवळपास साठ रुग्ण उपचारासाठी विनंती करत असल्याने वैद्यकीय प्रशासनाची कोंडी झाली होती. ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही मात्र ज्यांना रेमडिसेव्हर इंजेक्शनची गरज आहे, अशा रुग्णांना कसेही करुन तात्पुरती व्यवस्था उभारुन सामावून घेण्याचा निर्णय डॉ. सदानंद काळे, किरण गुजर व सहकाऱ्यांनी घेतला असल्याने रुग्णांना उपचार मिळाले आहे.
------
गृहविलगीकरणास परवानगी द्यावी...
रुग्णांची वाढती संख्या आता प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनू लागली आहे. गृहविलगीकरणास परवानगी देण्याची गरज आहे. संस्थात्मक क्वारंटाईन नको अशी भावना नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
----------रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे होते, त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. - डॉ. सदानंद काळे, सिल्व्हर वैद्यकीय अधिक्षक-----------------