मागील महिन्यात येथील रस्त्यालगत रेल्वेस्थानक आणि या ठिकाणी फलक लावून नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव यांनी दोन सुरक्षारक्षकही तैनात करीत रेल्वेच्या मालधक्क्याकडे ट्रकचा रस्ता केला होता. भिगवण रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यासाठी नगर परिषद प्रशासन रेल्वे प्रशासनाला गेल्या अनेक दिवसांपासून विनंती करत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाची आडमुठेपणाची भूमिका असल्याची नगर परिषद गटनेते सातव यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील भिगवण रस्त्याला समांतर रस्ता करण्यासाठी रेल्वे प्रशासन जागा देत नसल्याने अखेर शनिवारी थेट उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घातले आहे. रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले आहेत. त्यामुळे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातल्याने रेल्वे विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून रेल्वेच्या मालकीची जागा रस्त्यासाठी मिळावी म्हणून खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रेल्वेमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली. त्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री पवार यांनी रेल्वे मालधक्क्याकडे जाणारी वाहतूकच बंद करण्याचे आदेश देत तिसरा डोळा उघडल्याचे मानले जात आहे.