पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:09 PM2021-06-29T12:09:53+5:302021-06-29T12:10:06+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज सायंकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार

Deputy Chief Minister's meeting on various issues of Pune; But the mayor is not invited | पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही

पुण्याच्या विविध प्रश्नांवर उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक; मात्र महापौरांना निमंत्रणच नाही

googlenewsNext
ठळक मुद्देबैठकीतील उपस्थित प्रश्न हे पुणे महानगरपालिकेशी निगडित आहेत.

पुणे: पुणे शहरतील विविध प्रश्नांवर आज सायंकाळी सहा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. ही तातडीची बैठक मुंबईत बोलावली असून त्याला मात्र पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रणच नसल्याचे समोर आले आहे. विविध खात्यांचे मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये पुण्याच्या महापौरांचे नावच दिसून आले नाही.

शहरातील प्रलंबित कामे, नवीन उपाययोजना, तसेच इतर चर्चा यासाठी अशा बैठक होत असतात. कुठलेही निर्णय, सुविधा यामध्ये खरंतर महापालिकेचाही वाटा असतो. महापौरांशी चर्चा अथवा त्यांचे मत घेतल्याशिवाय शहरातील प्रश्न सोडवले जात नाहीत. समस्या आणि प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महापौरांशी चर्चा केली जाते. त्यामुळे या बैठकीला त्यांना निमंत्रण देणे अपेक्षित होते. पण बैठकीत त्यांना बोलावले नाही.

राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी शहरातील महत्वाचे प्रश्न मांडून त्यावर अजित पवार यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सतार, सतेज पाटील, बच्चू कडू, आमदार चेतन तुपे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीतील विविध प्रश्न 

म्हाडाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन, शिक्षण विभागातील रजा मुदतीतील शिक्षकांना कायम करण्याबाबत, समाविष्ट २३ गावांमधील शाळा महापालिकेस हस्तांतरित करणे, येरवड्यामध्ये अग्रेसन शाळा ते बालग्राम येथील शासनाची जागा महापालिकेला हस्तांतरित करणे, कळस विश्रांतवाडी येथील आरक्षित मुस्लिम - ख्रिश्चन दफनभूमीची जागा हस्तांतरित करणे, शिक्षण विभागाचा आकृतीबंध मान्य करणे, महापालिकेचे शासनाकडे प्रलंबित असलेले इतर विषय, अशा विविध प्रश्नांवर बैठक होणार आहे. 

महापौरांना निमंत्रण नसल्याची चर्चा 

बैठकीतील उपस्थित प्रश्न हे पुणे महानगरपालिकेशी निगडित आहेत. त्यामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ यांचे मत घेणे गरजेचे आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महापौरांना निमंत्रण नसल्याने सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Deputy Chief Minister's meeting on various issues of Pune; But the mayor is not invited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.