Ajit Pawar On Sharad Pawar Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर गणपतीचं बाहेरूच दर्शन घेतलं. यानंतर यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. शुक्रवारी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ते दर्शन घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच ते भीडे वाड्याचीही पाहणी करणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यांनी मंदिरात न जाता बाहेरूनच दर्शन घेतलं. दरम्यान, त्यांना मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नसल्याचं पुण्याच्या शहराध्यक्षांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील यावर स्पष्टीकरण दिलं.
“प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे. गेलं तर म्हणायचं का गेले. नाही गेलं तर म्हणायचं हे नास्तिक आहेत. हे तुम्ही दाखवायचं बंद केलं की बोलणारेही बंद होतील. असलं बोलणाऱ्यांच्या वर तुम्ही बॅन आणला पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले. माध्यम प्रतिनिधींशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
“अजित पवार जरी बोलले तरी त्यांच्यावर बॅन आणा. मिटकरी तर बाजूला राहू द्या. अनेक जण शाकाहार मांसाहार करतात. जर मांसाहार करणारी व्यक्ती एका रस्त्यानं जयला लागले आणि कोणी म्हटलं एखाद्या ठिकाणी आपण दर्शनाला जाऊ. काही जण मनात ठेवतात कोणाला सांगत नाहीत, तर काही जण बोलून दाखवतात त्या ठिकाणी जाण्यासाठी ज्या गोष्टी घडायला पाहिजेत त्या मी केल्या नाहीत. केवळ मंदिराच्या आतच जाऊन माथा टेकला तर खरं दर्शन, कधीकधी तर पंढरपूरला आपण पायरीचं दर्शन घेतो” असंही त्यांनी स्पष्ट केलं.