'वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं, परंतु त्यांना...'; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 08:10 PM2023-12-24T20:10:45+5:302023-12-24T20:15:02+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीच्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली.
माझ्यासोबत विधानसभेतील ५३ पैकी ४३ आमदार आहेत. देवेंद्र भुयार आणि संजमामा शिंदे या दोन अपक्ष आमदारांनीही पाठिंला दिला आहे. विधानपरिषदेतील ९ पैकी ६ आमदार माझ्याबरोबर आहेत. मी घेतलेला निर्णय योग्य असल्यानेच ही लोक माझ्याबरोबर आली, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज बारामतीतील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. मी ६० वर्षाचा झाल्यावर भूमिका घेतली. काहींनी ३८व्या वर्षी वसंतदादांना मागे सारल्याचं विधान अजित पवारांनी केलं.
माझे विचार अतिशय स्पष्ट असतात. मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी ३८ व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होतं. मात्र तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन केली, असा निशाणा अजित पवारांनी शरद पवारांवर साधला. तसेच त्यामुळे तुम्ही मला समजून घेतले पाहिजे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
बारामतीकरांनेा थोडासा दम धरा ,आणि इथुन पुढे फक्त माझ एका, बाकी कोणाच ऐकू नका. बाकीच्यांच लय वर्ष कोणाकोणाच ऐकले.आता माझ ऐका. मी तुम्हाला अस काही करुन दाखवितो, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. बारामतीकरांच्या भक्कम पाठींब्यावर मी आज उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रिपदापर्यंत पोहचलो. जोपर्यंत बारामतीकर माझ्या पाठीशी आहेत. तोपर्यंत मी विकासकामांना कमी पडणार नाही. मात्र, मला सर्वांना सांगायच आहे, तुम्हाला कठोर भुमिका घ्यावी लागेल. ज्याला माझ्या बरोबर रहायच आहे. त्यांनीच रहावे. इकडेपण तिकडेपण चालणार नाही, असं अजित पवारांनी सांगितले.
देशपातळीवर मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही-
आज देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कणखर नेतृत्व नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले आहे. तुम्ही खर्गे आणि नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर आणा, भारतीय नागरीक कोणाला मतदान करणार, लोकसभा निवडणुकीचे मतदान पंतप्रधानांचा चेहरा पाहुनच होईल. मोदी यांच्या कामाचे अनेक दाखले देवु शकतो, ही वस्तुस्थिती आहे. देशाचा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला, अशा शब्दात अजित पवार यांनी मोदी शहा यांचे कौतुक केले.