देहू येथे अजित पवार भाषणापासून 'वंचित', PM मोदीही म्हणाले 'दादांना बोलू द्या'; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 08:45 PM2022-06-14T20:45:39+5:302022-06-14T22:06:51+5:30
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिर लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या वैष्णव संवाद सभेच्या कार्यक्रमात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित वारकऱ्यांशी संवाद साधला. मात्र, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे व्यासपीठावर उपस्थित असतानाही त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमकं काय घडलं -
कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर, सूत्रसंचालकाने भाषणासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नाव घेतले. यावर लगेचच, 'अजित दादांना बोलू द्या', असा इशारा पंतप्रधान मोदींनी सूत्रसंचालकाला केला. पण यावेळी अजित दादांनीही 'आपण बोला', असे म्हणत मोदींना खुणावले. अखेर, सूत्रसंचालकाने बोलण्यासाठी नाव घेतल्याने आणि अजित दादांनीही बोलण्याची विनंती केल्याने मोदी भाषणासाठी डायसकडे गेले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही व्यासपीठावर उपस्थित होते.
शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला यायला मिळणे हे माझे भाग्य -
तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचे केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला यायला मिळणे हे माझे भाग्य आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका -
मोदी म्हणाले, जो भंग होत नाही, तो अभंग. शिवरायांच्या आयुष्यात तुकाराम महाराजांची महत्त्वाची भूमिका आहे. संताची उर्जा समजाला गती देण्याचे काम करते. तसेच देशभक्तीसाठी तुकोबांचे अभंग महत्त्वाचे आहेत.
अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान - सुप्रिया सुळे
“मिनिट टू मिनिट कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला अजित पवारांचे भाषण व्हावे यासाठी माहिती पाठवली होती. परंतु त्यांची विनंती मान्य झाली नाही. त्यांना बोलू न देणे हे दुर्देव आहे. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. एवढेच नाही तर, "विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाषण करू देता पण आमच्या नेत्यांना करू देत नाही, ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.