उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वज जण उत्तम राजकारणी म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेतच. पण ते तितकेच हजरजबाबीदेखील आहेत. अजित पवारांच्या एका वक्तव्यामुळे सर्वांमध्येच हसा पिकल्याचं शनिवारी पाहायला मिळालं.
अजित पवारांच्या कार्यक्रमात एका दारूड्यानं अचानक एन्ट्री घेतली. त्यावेळी त्याला थांबवण्यासाठी बाजूचे पुढे सरसावले. मात्र त्याच वेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांमध्ये एकच हशा पिकला. "होय बाबा... होय बाबा... दुपारीच चंद्रावर, काय चाललंय काय?" असं ते म्हणाले. यानंतर सर्वांमध्ये एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी कार्यक्रमातही या घटनेचा उल्लेख केला.
"आता पाहिलं दुपारीच एक जण चंद्रावर गेला होता. त्यात श्रावणी शनिवार आहे. काय आता करता?, व्यसनाधीन झाल्यावरही त्रास होतो. त्यांना व्यसनापासून बाजूला करण्याचं कामही आपण केलं पाहिजे," असंही अजित पवार म्हणाले.
यापूर्वी पुणेकरांवरही केली होती विनोदात्मक टोलेबाजी'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही,' असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे सांगितली आणि जोरदार विनोदात्मक टोलेबाजी केली. “नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरु शकणार नाही. आता जिथे हा कार्यक्रम होतोय तिथे जुन्या काळी विचित्र अपघात, खून मारामाऱ्या होत असायचे. तसंच या भागात रान डुकरांचा जास्त वावर होता. याभागाला ‘डुक्कर खिंड’ असं म्हटलं जातं. 'पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही. पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो. जिथे देवांना सोडलं नाही तिथे माणसांची, ठिकाणांची काय कथा,” असंही ते विनोदानं म्हणाले होते.