पुणे : तळजाई टेकडीवरील १०८ एकर जागेवर वसुंधरा उद्यान उभारण्याबाबत उपमुख्यमंत्री नकारात्मक नव्हे तर सकारात्मकच असल्याचा दावा कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी केला आहे. टेकडीसंदर्भात झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बागूल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
तळजाई टेकडीसंदर्भात अजित पवार यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थानिक नगरसेवकांसोबत बैठक घेतली होती. यावेळी वसुंधरा उद्यानाची चित्रफीत दाखवून सादरीकरण करण्यात आले. याठिकाणी बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, रानमेवा उद्यान, मसाल्याचे उद्यान उभारण्यात येणार असल्याची माहिती बागूल यांनी दिली. या उद्यानाच्या पहिल्या टप्प्यात क्रिकेट महर्षी कै. स. दु. शिंदे क्रिकेट मैदान उभारण्यात आले आहे. पुढील टप्प्यासाठी बांबू उद्यान, सोलर पार्किंग, नक्षत्र उद्यान व स्प्रिं कलर लावण्याच्या निविदा मंजूर करण्यात आल्याचे बागूल यांनी सांगितले. तळजाईच्या १०८ एकर जागेपैकी ७० टक्के जागा पालिकेच्या ताब्यात असून उर्वरित ३० टक्के जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. वसुंधरा उद्यान करण्यासाठी संपूर्ण आराखडा मुख्य सभेसमोर ठेऊन त्याची मान्यता घ्यावी, काम सुरु झाल्यानंतर बंद पडू देऊ नका, स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा करण्याच्या सूचना यांनी दिल्याचे बागूल म्हणाले.