पुणे : बांधकाम ठेकेदाराकडून शाळा आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याला विशेष न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला.
सुधीर विठ्ठल सोनावणे (वय ५१, रा. टिंगरेनगर) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या उपअभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम ठेकेदार असलेल्या तक्रारादारांनी २०१८-१९ मध्ये महापालिकेच्या तीन शाळा आणि करोना काळात स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम केले होते. शाळांच्या आणि स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामाचे बिल मंजूर केल्याचा मोबदला म्हणून उपअभियंता सोनावणेने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार, पुणे महापालिकेच्या आवारात सापळा रचून एसीबीने सोनावणेला ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
आरोपी सोनावणेला सोमवारी (दि.२३) न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपी असण्याची दाट शक्यता आहे का, त्याबाबत तपास करायचा आहे, आरोपीच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे, आरोपीने लाचेची मागणी स्वत:साठी की अन्य कोणासाठी केली होती, याचा तपास करायचा आहे, त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.