पुणे : महापालिकेत प्रवेश करताना ओळखपत्र विचारल्याने तसेच पालिकेतून बाहेर जाताना बंदी असलेल्या बाजूने बाहेर जाण्यास अटकाव केल्याने एका उपअभियंत्याने पालिकेतील तृतीयपंथी सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा प्रकार महापालिकेत घडला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला असला, तरी मारहाण झालेल्या तिन्ही सुरक्षारक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सुरक्षा विभागास दिले आहेत.
महापालिकेच्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या कामगारांना पालिकेचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. सकाळच्या सुमारास हा अभियंता पालिकेत आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाने अभियंत्याला ओळखपत्र मागितले. मात्र, ओळखपत्र नसल्याचे अभियंत्याने सांगताच सुरक्षारक्षकाने नाव नोंद करण्याची विनंती केली. यावेळी मी ३० वर्षे नोकरी करतो. मला ओळखत नाही का, असे सुनावत हा कर्मचारी आत निघून गेला. त्यानंतर काही वेळाने हा कर्मचारी पुन्हा महापालिकेतून बाहेर निघाला. यावेळी त्याने बाहेर जाण्यास मनाई असलेल्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला मज्जाव करण्यात आला. त्याच वेळी या बाजूने एका दिव्यांगाला जाऊ देण्यात आले. त्यावरून संतापलेल्या या अभियंत्याने तीन तृतीयपंथींना मारहाण केली. यापूर्वीही या अभियंत्याने एका विभागप्रमुखाला धक्काबुक्की केलेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याने जवळपास साडेतीन ते चार महिने निलंबित असलेल्या कनिष्ठ अभियंत्याने पुन्हा कामावर रुजू होताच ही मारहाण केली आहे.
मारहाणीनंतर सुरक्षारक्षक राहिले शांत
तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार तृतीयपंथीयांना महापालिकेच्या सेवेत सहभागी करून घेतले. सुरक्षा विभागात ते सुरक्षारक्षक म्हणून रुजू झाले आहेत. मात्र, हे काम करताना कोणाशी वाद झाला तर त्यांनी शांत राहावे, त्यासाठी स्वभावातील आक्रमकता कमी व्हावी, या उद्देशाने महापालिकेने त्यांना ११ दिवसांचे मानसिक संतुलनाचे विशेष प्रशिक्षणही दिले होते. त्यामुळे मारहाणीच्या घटनेनंतरही हे दोन्ही सुरक्षारक्षक शांत राहिल्याने त्यांचे कौतुक होत आहे.