बारामती : एमपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ विविध पदांच्या माध्यमातुन मिळाले.याच पार्श्वभूमीवर बारामती शहरातील युवकाने स्पर्धा परीक्षेत मिळविलेले यश चर्चा आणि कौतुकाचा विषय ठरले आहे. चित्रपटात शोभणारी ही जीवनकहानी तितकीच प्रेरणादायी आणि खडतर संघर्षमय आहे. ही सत्य कथा शहरातील एका ‘मटका’ व्यावसायिकाच्या मुलाचे आहे. विक्रांत कृष्णा जाधव असे या २९ वर्षीय युवकाचे नाव आहे. नुकत्याच जाहिर झालेल्या एमपीएससी परीक्षेत विक्रांत याची नायब तहसिलदार पदी निवड झाली आहे. बारामती शहरातील कृष्णा जाधव हे मटका व्यावसाय चालवत असत, त्यांचा दोन वर्षांपूर्वी खून झाला आहे. त्याच जाधव यांच्या घरात जन्मलेल्या विक्रांत यांनी भटक्या विमुक्त जाती मधून घरची परिस्थिती व वातावरण नसताना आकाशाला गवसणी घालणारे यश मिळविले.विक्रांत यांचे वडील मटका व्यावसायिक असले तरी त्यांनी मुलाला नेहमीच उच्च शिक्षण,उच्च पदाची स्वप्न दाखविली. मटका व्यवसायाचा घरावर परिणाम न होण्याची दक्षता घेतली. मुलावर योग्य संस्कार होतील याची काळजी घेतली.घरच्या आसपास सगळा गोंधळ, विचित्र लोक असताना वडिलांनी याचा कुटुंबाला कधी त्रास होऊ दिला नाही.त्यामुळे विक्रांत यांनी लहानपणापासुनच वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्याने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या जिद्दीवर व प्रामाणिक कष्टाच्या जीवावर व आई व लहान भावाच्या पाठिंब्यावर नायब तहसीलदार पदी झेप घेतली आहे.
सुरुवातीपासुनच वडिलांनी प्रोत्साहन दिल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला वकिली पेशात प्रवेश करायचे ठरवलेल्या विक्रांत यांनी वडिलांच्या इच्छेसाठी स्पर्धा परीक्षेची बिकट वाट निवडली. मात्र, पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले.पहिल्याच अपयशाने खचून गेल्याची कबुली देखील विक्रांत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
२०१७ मध्ये जोमाने ध्येय पूर्ण करण्याच्या उद्देशाने रोज १० -१२ तास अभ्यास सुरू केला .२०१८ साली सहाय्यक कक्षाधिकारी म्हणून भटक्या विमुक्त जाती प्रवगार्तून राज्यात पहिला क्रमांकावर निवड झाली. ५ नोव्हेंबर २०१८ साली मटका व्यवसायाच्या वादातून वडिलांचा खून झाला. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांनी १९ मार्च २९१९ ला विक्रांत यांची मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी पदावर निवड झाली. मुलाला अधिकारी म्हणुन घडविण्याचे स्वप्न पूर्ण झालेले पाहण्यासाठी वडील हयात नव्हते. मात्र,आई आणि लहान भावाने पाठिंबा दिला.त्यामुळे ते दु:ख विसरून चांगला प्रयत्न करत आणखी मोठे पद मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. शुक्रवारी (दि १९) लागलेल्या निकालात नायब तहसीलदार पदी निवड झाली आहे.विक्रांत यांचे म ए सो हायस्कूल मध्ये प्राथमिक शिक्षण झाले असून टी.सी कॉलेज मधून कॉमर्स मधून पदवी मिळवली आहे.
विक्रांत सध्या सहाय्यक कक्षा अधिकारी पदावर रुजू आहेत. तसेच भविष्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पदी विराजमान होण्याचा मानस विक्रांत यांनी बोलून दाखवला. भविष्यात यासाठी चांगला अभ्यास व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेचा सगळा अभ्यास घरीच केला .यासाठी वेगवेगळे प्रयोग करत स्वत:च चुका सुधारत गेल्याचे विक्रांत यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावा. आपल्या अडचणींवर मात करावी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास असणे गरजेचे आहे.आपली दु:ख उगाळत न बसता विद्यार्थ्यांनी चांगला प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळेल असे जाधव यांनी सांगितले.———————————————...मला मटक्याच्या व्यवसायातून मुक्त करविक्रांत जाधव यांचे वडील कृष्णा जाधव यांची आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, वडील मला म्हणायचे चांगला अभ्यास कर. यासाठी मी तुला हवी ती मदत करीन .पण चांगला अधिकारी होऊन मला या मटक्याच्या व्यवसायातून मुक्त कर. तु माझे स्वप्न पुर्ण केल्यावर मी समाजात ताठ मानेने फिरु शकतो.आज पूर्ण झालेले स्वप्न पाहण्यासाठी वडील हयात नसल्याचे सांगताना विक्रांत जाधव यांना भरून आले होते.————————————————