पुणे : खासगी व सरकारी आस्थापनामध्ये नोकरी करणाऱ्या अनेक व्यक्तींकडे रिक्षा परवाना (परमीट) असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल, तर ते ३१ जानेवारीपर्यंत परत करावे लागणार आहे. नोकरी करताना रिक्षा परवाना ज्यांच्याकडे आहे, अशा परमीटधारकांवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई केली जाणार आहे.
पुणे शहराची लोकसंख्या ८० लाखांच्या पुढे आहे. नागरिकांना प्रवाशांच्या सोईसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमीट दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या प्रमाणात रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर आरटीओकडून नवीन रिक्षांना परवाने देण्यास २०१७ पासून सुरू करण्यात आले होते. २०१७ पर्यंत पुणे शहरात ४६ हजार ४ रिक्षांना परवाने देण्यात आले होते. नव्याने रिक्षा परवाने देण्यास सुरू केल्यानंतर अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली आहे. पुण्यात सध्या ८३ हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. तर, पिंपरी चिंचवड परिसरात देखील ४० हजार रिक्षा परवाने दिले आहेत. त्यामुळे रिक्षांची संख्या वाढली असून, ज्याला गरज आहे अशांना परवाना मिळेना. शिवाय नोकरी करत असताना, रिक्षा परमीट बाळगणे हा कायद्याच्या विरोधात आहे.
अन्यथा कारवाई...
मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. तरीही शहरात काही जण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी येत आहेत. रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वेच्छेने परत करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी येत्या ३१ जानेवारीपर्यंत रिक्षा परवाना परत करावा. त्यानंतर आरटीओकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षा परवाने वेळेत जमा करावे, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.