पुणे : शरद पवार यांचे वय ८४ असले तरी कोणीही आदर्श घ्यावा असेच त्यांचे काम आहे. ते ज्या जिद्दीने लढत आहेत, तेही आदर्श घेण्यासारखेच आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
खासदार सुळे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत शहरातील समस्यांवर चर्चा केली. पाणी, कचरा, वाहतूक या प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने नगरविकास विभाग, सिंचन विभाग यांच्याबरोबर संपर्क साधून ठाेस काम करावे, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.
याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ‘अजित पवार यांच्याकडून आक्रमकपणे टीका केली जाते; मात्र शरद पवार यांच्याकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. त्यामुळे पवार कुटुंबीय कुठे तरी एकत्र आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.’ असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर खा. सुळे म्हणाल्या की, मी राजकारणात आरेला कारे करण्यासाठी आले नाही. मी यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीत वाढलेली एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आरेला कारे करणं सोपं आहे; मात्र शांत बसून सहन करणं फार अवघड असतं असा मला वाटतं.
ॲड. आंबेडकरांना संसदेत पाहायला आवडेल
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर मनापासून आनंद होईल. त्यांना संसदेत पाहायला मला आवडेल. लवकरच इंडिया आघाडीचे नियोजन जाहीर करू. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचे नियोजन देखील लवकर केले जाईल, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.