पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून मंगळवारी रात्री आठवाजेपर्यंत एकूण ३० हजार ८१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अकरावी प्रवेशाची पहिली फेरी संपली असून या फेरीतून २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश मिळूनही तब्बल१४ हजार ४३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली जात आहे.पहिल्या फेरीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ७९६ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे अलोटमेंट करण्यात आले होते. मात्र, त्यातील केवळ २४ हजार ६५७ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. इतर काही विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा व अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एकूण प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या ३० हजाराहून अधिक आहे.
शिक्षण विभागातर्फे पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ३११ कनिष्ठ महाविद्यालयातील जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार होती. परंतु, प्रवेश प्रक्रियेतील तीन महाविद्यालये कमी झाले आहेत. त्यामुळे आता ३०८ महाविद्यालयातील १ लाख १० हजार ७२५ जागांवर प्रवेश राबविले जाणार आहेत. या जागांवर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यामुळे आता प्रवेशासाठी ७९ हजार ९०९ जागा उरल्या आहेत.
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतून पहिला पसंतीक्रमानुसार २२ हजार ६६५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यातील १८ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र,४ हजार १६२ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील दोन फे-यांमध्ये सहभागी होता येणार नाही.