जम्बो सेंटर सप्टेंबर महिन्यात सुरु झाले. तब्बल ८०० खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात आजमितीस १६५ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालय उभारणी सुरु असल्यापासून रुग्णांना प्रत्यक्ष उपचार मिळेपर्यंत ‘लोकमत’ने प्रत्येक समस्येचा पाठपुरावा केला. पहिल्याच दिवशी रुग्णांना उपचार मिळण्यात झालेली दिरंगाईही ‘लोकमत’ने प्रत्यक्ष रुग्णालयातूनच मांडली होती. जम्बो रुग्णालयामध्ये रुग्णांचे झालेले मृत्यू, लाईफलाईन या एजन्सीने केलेला हलगर्जीपणा, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू, डॉक्टरांचे आंदोलन, बाऊन्सर्सचा खडा पहारा आणि आता परिचारिकांचे आंदोलन अशा अनेक घटना जम्बोमध्ये घडल्या आहेत.
एजन्सीच्या खांद्यावर भार टाकून मोकळ्या झालेल्या पालिका आणि पीएमआरडीए प्रशासन जम्बोमधील एजन्सीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यात कमी पडले आहे. त्यामुळेच जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिने वेतन न देण्यापर्यंत एजन्सीची मजल गेली आहे.