विशाल थोरात - पुणे : येरवडा, विमाननगर, नगर रस्ता व खराडी परिसरातील अनेक आयटी कंपन्या व कॉल सेंटर गुरुवारीही (दि. १९) सुरूच होते. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी एकत्रित काम करतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 'वर्क फ्रॉम होम'च्या आदेशाला काही कंपन्या हरताळ फासत असल्याचे दिसले. तर अनेक कंपन्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक साधन सुविधा उपलब्ध करून घरून काम करण्याची मुभा दिल्याने या कंपन्यांची कार्यालये बंद केल्याचेही दिसून आले. येरवड्यात जेल रस्त्यावरील कॉमरझोन आयटी पार्कमध्ये सुमारे ५० आयटी आणि कॉलसेंटर कंपन्या आहेत. एका-एका कंपनीत ५०० ते २ हजारांपर्यंत कर्मचारी काम करतात. यातील बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. मात्र, याठिकाणी गुरुवारीही अनेक कंपन्या सुरू असल्याचे दिसले. तर अनेक कर्मचारी आयटी पार्कबाहेर घोळक्याने थांबून गप्पा मारत अथवा चहानाष्टा घेत उभे असल्याचे दिसले. या आयटी पार्कची सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहेत. केवळ जेल रस्त्यावरील मुख्य प्रवेशद्वारातून कर्मचारी व वाहनांना प्रवेश दिला जात आहे. याठिकाणी 'बॉडी टेम्परेचर स्कॅनर गन'च्या साह्याने आयटी पार्कमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे शरीराचे तापमान मोजले जात होते. सामान्यापेक्षा जास्त ताप आढळलेल्या व्यक्तीला बाहेरच थांबवण्यात येत होते. याठिकाणी चौकशी केली असता जवळपास सर्वच कंपन्या बंद करून कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. अनिवार्य कारणास्तव काही कंपन्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली. विमाननगरमध्ये निको गार्डन सोसायटीसमोरील एक्सा सर्व्हिसेस व इतर देशांचा व्हिसा देणारी कंपनीही गुरुवारी सुरू होती. मात्र, एक्सा कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरून काम करता यावे, यासाठी कारवाई सुरू केली आहे. कदाचित सोमवारपासून घरून काम करण्यास मुभा मिळेल, असे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर नगर रस्त्यावरील इन ऑर्बिट मॉल व खराडीतील इऑन आयटी पार्कमधील काही आयटी कंपन्याही गुरुवारी सुरू होत्या. याबाबत प्रतिक्रिया देताना येरवड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख म्हणाले, की आमच्या हद्दीतील कंपन्या, कार्यालये व इतर आस्थापना गरज नसताना सुरू न ठेवण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत. मात्र, काही कंपन्यांचा कारभार आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असल्याने अनिवार्य कारणास्तव या कंपन्या सुरू ठेवण्यात आल्या असल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातही कंपन्या सक्तीने बंद न करण्याच्या सूचना आहेत. मात्र, अनिवार्य कारणास्तव सुरू राहणाऱ्या कंपन्यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे. याबाबत सदर कंपन्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून तशी कारवाई सुरू केली आहे.
विमानतळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात कंपन्या बंद करण्याची सक्ती नसल्याचे म्हटले. तरीही सुरू असलेल्या कंपन्यांबाबत माहिती घेऊन त्यांना योग्य त्या सूचना करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. .................... चौकाचौकांत गर्दी टाळावी...
कंपन्या, सार्वजनिक कार्यालये व इतर आस्थापना बंद करून कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिल्याने गर्दी कमी होत आहे. मात्र येरवड्यातील गोल्फ चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी येणारी-जाणारी एकाचवेळी हजार-पाचशे माणसे दिसतात. नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे अथवा घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख म्हणाले.