विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबरोबरच पुणेकरांमध्ये निष्काळजीपणाही वाढत चालला असल्याचे दिसून येऊ लागले आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळावे, घराबाहेर मास्कचा वापर करावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. असे असतानाही त्याला लोक जुमेनासे झाले आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर पोलिसांनी विनामास्क जाणाऱ्यावरील कारवाई कडक केली. खिशाला चाट पडत असतानाही लोकांना त्याचे गांभीर्य जाणवत नाही. गेल्या १३ दिवसांत शहर पोलिसांनी तब्बल १२ हजार ३५७ जणांवर विनामास्कची कारवाई केली असून, त्यांच्याकडून ८७ लाख ११ हजार ९३५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. हा आकडा फक्त पुणे पोलिसांच्या तावडीत सापडलेल्यांचा आहे. याच काळात पुण्यात १० हजार ३६६ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे.
शहरात मास्क बंधनकारक करण्यात आल्यानंतर २१ फेब्रुवारीपर्यंत २ लाख २७ हजार ६५८ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ११ कोटी १ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला होता. त्यानंतरच्या गेल्या १३ दिवसांत तब्बल १२ हजार ३५७ जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली. साधारण दररोज सरासरी साडेनऊशे जणांवर कारवाई करुन दररोज ६ लाख ७० हजार रुपये दंड वसूल केला जात आहे.
विनामास्क पकडल्यास ५०० रुपयांचा दंड केला जातो. संसर्ग टाळला जावा आणि कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने विनामास्कची कडक कारवाई केली जात आहे. असे असतानाही लोकांना त्याचे भान राहिले नसल्याचे दररोज विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येवरुन वाटू लागले आहे. असेच चालू राहिले व बाधितांची संख्या वाढू लागली तर, पुन्हा आणखी निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आणखी निर्बंध नको असतील तर लोकांनी मास्कचा वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.
तारीख -विनामास्क कारवाई- दंड वसूल
२२ फेब्रुवारी ९०२ ४४६२००
२३ फेब्रुवारी ८२२ ४००२००
२४ फेब्रुवारी ११४७ ६११७००
२५ फेब्रुवारी १००१ ४८७६००
२६ फेब्रुवारी ८२० ४०८८००
२७ फेब्रुवारी १०९७ ५३७७००
२८ फेब्रुवारी ८५३ ४१५३००
१ मार्च १२२२ ५९८२००
२ मार्च ९९८ ४९०२००
३ मार्च ८१६ ३९६४००
४ मार्च ८८३ ४३२३००
५ मार्च ८५३ ४२३७००
६ मार्च ९४३ ४६७०००
.....
शनिवार ६ मार्चअखेर पुणे शहरात २ लाख ४० हजार १२३ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ कोटी ६३ लाख ५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.