राजकीय मतभेद असले तरी पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:43 PM2023-10-20T19:43:18+5:302023-10-20T19:51:00+5:30
पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले....
बारामती : पवार कुटुंबीयांची दिवाळी कालही एकत्र साजरी होत होती, आजही आहे. उद्याही ती होईल. आमच्यात राजकीय मतभेद जरूर आहेत; परंतु, राजकीय मतभेद व कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. राजकारणात कोणीही कुटुंबातील नाती, जबाबदाऱ्या डावलू नयेत, या मताची मी आहे. पवार कुटुंबीयांची दिवाळी एकत्रच साजरी होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
बारामती येथील माळावरच्या देवीचे खासदार सुळे यांनी शुक्रवारी (दि. २०) दर्शन घेतले. यावेळी सुळे यांनी पवार कुटुंबीयांच्या बदलत्या राजकीय समीकरणानंतर दिवाळीत पवार कुटुंब एकत्र येणार असल्याचे संकेत दिले. त्या पुढे म्हणाल्या, आपण भारतीय सुसंस्कृत लोक आहोत. त्यामुळे या दोन गोष्टींत गल्लत करू नये. जेथे राजकीय लढाईचा विषय येईल तेथे ती पूर्ण ताकदीने लढू; परंतु, कुटुंबाचा विषय असेल तर राजकारण बाजूला ठेवू.
दरवर्षी दिवाळी पाडव्याला राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पवार कुटुंबीय बारामतीत गोविंदबागेत एकत्र भेटतात. यंदा बदललेल्या राजकीय समीकरणानंतरही “राजकीय मतभेद वेगळे असतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगळ्या असतात,” असे सुळे यांनी स्पष्ट केले.
रविवारी (दि. २२) भिगवणजवळ होणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व आपण एकाच व्यासपीठावर असाल का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, “एकतर राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहेत. आमच्यातील काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत गेले. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यासंबंधीची कायदेशीर लढाई न्यायालयात व निवडणूक आयोगात सुरू आहे. परंतु, विद्या प्रतिष्ठान व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या दोन संस्था सामाजिक काम करतात. विद्या प्रतिष्ठानची स्थापना ५० वर्षांपूर्वी शरद पवार यांनी केली. या दोन्ही संस्थांच्या कार्य़क्रमाला पवार कुटुंबीय कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आले आहे. त्याला राजकीय स्वरूप देणे चुकीचे ठरेल,” असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले.
गोविंदबाग हे महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेचे अधिकाराचे घर आहे. त्यामुळे ३६५ दिवस ते उघडेच आहे. तुम्ही तेथे कधीही येऊ शकता. तेथे माझ्यापेक्षा तुमचा गुंजभर अधिकार जास्त आहे. नेते म्हणून नाही, तर कौटुंबिक नाते म्हणून आम्ही कुटुंबीय म्हणून एकत्र येऊ, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ससूनमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या, एक महिला ठामपणे ड्रग्जविरोधात लढत असताना राज्यातील ट्रिपल इंजिनचे खोके सरकार दडपशाही करीत आहे. दमदाटीची भाषा केली जात आहे. परंतु, आम्ही अंधारे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना पाठिंबा व्यक्त केला.