बावधन (पुणे) : चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान पौड रस्त्यावर रोह वाहतूककोंडी होते. त्यामुळे या महामार्गावर केवल एक किलोमीटरचे अंतर कापायला तब्बल एक तास लागत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आणि कोट्यवधी रुपये खर्च करून, चांदनी चौकातील पूल पाडून नवे महामार्ग आणि उड्डाणपूल बांधण्यात आले खरे. मात्र, त्यामुळे ना वेळ वाचला ना वाहतूकीकोंडीची समस्या सुटली.
विशेषत: या परिसरातील असणाऱ्या बावधन आणि भूगावकरांना या कोंडीचा भयंकर त्रास होत आहे. त्यामुळे ‘अहो साहेब, काहीतरी करा पण.... ही वाहतूककोंडी सोडवा’ अशी आर्त याचनाच प्रशासनाला बावधन आणि भूगावकर नागरिकांनी केली आहे. चांदणी चौक ते भूगावच्या दरम्यान दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दी आहेत. भूगावच्या रामनदीपर्यंत पौड तर तेथून पुढे चांदणी चौकापर्यंत हिंजवडी पोलिस ठाणे. त्यात पौड पोलिस ठाण्याच्या वतीने येथे दररोज तीन ते चार कर्मचारी वाहतूककोंडी सोडवितात, तर पौड पोलिसांची पेट्रोलिंगची गाडीही दररोज या ठिकाणी फिरवून वाहतूककोंडी मोकळी करत असते, परंतु राम नदीच्या पुढील रस्ता हा बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये येत असून, येथील कर्मचाऱ्यांनी भागवत फार्मजवळील एलोरा वाइनच्या ठिकाणी थांबून वाहतूककोंडी सोडविणे खूपच गरजेचे आहे, परंतु राम नदी ते चांदणी चौका दरम्यान पोलिस कर्मचारी नसल्याने, भूगावपासून सुरळीत झालेली वाहतूक पुन्हा कोंडीत सापडते. त्यामुळे दररोजच वाहतूककोंडी होत असल्यामुळे भूगावकर तर त्रस्त आहेत.
या वाहतूककोंडीमुळे शहरातून या परिसराच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे येथील हॉटेल व्यवसायावरही परिणाम झाला आहे. येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पुणे-कोलाड रस्त्याचे काम अतिशय संथपणे चालत आहे. त्यामुळेही येथील वाहतुकीवर परिणाम होत आहे.
पुलाची रुंदी वाढविण्याची गरज
पुणे-कोलाड हायवेचे राहिलेले रस्त्याचे अर्धवट काम आणि बेशिस्त वाहन चालक यांच्यामुळे भूगावमध्ये वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातही भागवत फार्मवरून बावधन मार्केट यार्ड, जाधव वस्तीमार्गे बाळतुका इस्टेटपर्यंतचा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नेहमीच झाली आहे, तसेच पुण्यातून येणारी वाहने आणि मारीगोल्डच्या बाजूने येणारी वाहने ही एकत्र आल्यामुळे एलोरा वाइनच्या ठिकाणी दररोज दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. चांदणी चौकाच्या बाजूला एम्ब्रोस्यापर्यंत तर भूगावच्या बाजूला दौलत गार्डनपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.
भूगावच्या बाजूला राम नदीवरील पुलाची रुंदी वाढविण्याची गरज असून, या ठिकाणी अरुंद पूल असल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहने व्यवस्थित जात नाहीत. पुणे-कोलाड हायवे होत असताना, या नदीवरील पूलही उंची वाढवून रुंद आणि प्रशस्त करावा लागणार आहे.