BJP Hemant Rasne ( Marathi News ) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील ६ मतदारसंघातील उमेदवार देखील घोषित करण्यात आले असून, कसबा मतदारसंघातून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत रासने यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, परंतु गेल्या दीड वर्षांमध्ये रासने यांनी मतदारसंघात संघटना बांधणीसोबतच नागरिकांमध्ये जात केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा उमेदवारी मिळवली आहे.
पोटनिवडणुकीनंतर हेमंत रासने यांनी मतदारसंघात असणाऱ्या सहाही प्रभागांतील रस्त्यावर टेबल मांडत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. महाआरोग्य अभियान, लाडकी बहीण योजनेची नोंदणी मोहीम तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला. भाजपने रासने यांच्यावर निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी कसब्यात मजबूत संघटना बांधणी केल्याने लोकसभा निवडणुकीत आपल्याच मतदारसंघात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर पिछाडीवर गेले. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास १५ हजारांचे मताधिक्य कसब्यात मिळवले, याचीच फलश्रुती उमेदवारी मिळवण्यात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या सर्व सर्व्हेत रासने राहिले आघाडीवर कसबा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे, कुणाल टिळक, स्वरदा बापट इच्छुक होत्या. उमेदवार निवडीसाठी भाजपकडून ५ ते ६ सर्व्हे करण्यात आले, ज्यामध्ये हेमंत रासने यांचेच नाव आघाडीवर राहिले.