पुणे: ‘....आणि एकदा काय झालं... असं म्हणत शाळेत गोष्ट सांगणाऱ्या शिक्षकालाच जेव्हा पुरस्कार मिळतो, तेव्हा अभिमान वाटतो. बाल शिक्षण मंदिरापासून माझा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. विमलाबाई प्रशालेतून १० वी पास झालो. ऐंशीच्या दशकात शाळेत असताना माध्यम फक्त संभाषण आणि व्यक्तिगत भेट हेच होतं. त्यामुळे तो माणसाशी माणसाचं नात जोडणारा काळ होता. आताच्या काळात मुलं चॅटिंग करतात; पण आम्ही तेव्हा कट्ट्यावर तासनतास गप्पा मारत बसायचो,’ अशा भावना ज्येष्ठ संगीतकार, लेखक, दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
शाळेतील शिक्षण काय देतं असं जर मला विचारलं, तर आईसारखं आईपण असतं, तसं शाळेचं शाळापण मला माझ्या शाळांनी दिलं. मला आठवतं माझी बहीण आजारी होती, तिचा अभ्यास बुडू नये म्हणून भाटवडेकर बाई घरी येऊन तिला शिकवायच्या. तो प्रसंग अजूनही मला कायम स्मरणात आहेत. शिक्षकांशी जे व्यक्तिगत नातं होतं ते आताच्या काळात दिसत नाही.
विमलाबाई प्रशालेत फाटक बाई होत्या. सातवीत असताना रविवार नाट्यसंगीत स्पर्धा असायची. मी क्रिकेट खेळायला निघून गेलो; पण घरी सांगायचं विसरलो. बाई स्पर्धेच्या ठिकाणी वाट बघत होत्या, मी आलो का नाही म्हणून त्यांनी रविवार असतानाही शाळेचे ऑफिस उघडून माझा पत्ता काढला आणि माझ्या घरी आल्या. आईला सोबत घेऊन मी ज्या ठिकाणी होतो, तेथून मला रिक्षात बसवलं आणि स्पर्धेला नेलं. यातून त्यांची आपुलकी आणि प्रेम मला दिसलं. ते माझ्या कायमचं लक्षात राहिलं.