विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 20:43 IST2024-12-23T20:41:44+5:302024-12-23T20:43:29+5:30
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वळसे पाटील यांनी घटलेल्या मताधिक्याबाबतची सल बोलून दाखवली आहे.

विजय मिळवूनही आपण लाजत फिरतोय; वळसे पाटलांनी बोलून दाखवली घटलेल्या मताधिक्याची सल
Dilip Walse Patil ( Marathi News ) : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये मोठी उलथापालथ झाली. पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. मागील अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील हे यंदा केवळ १५०० मतांनी विजयी झाले. या निवडणूक निकालानंतर आता कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वळसे पाटील यांनी घटलेल्या मताधिक्याबाबतची सल बोलून दाखवली आहे.
"विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत आपण जिंकलो. पण जिंकलो असलो तरी आपण लाजत-लाजत फिरतोय आणि जे हरले ते गावच्या पाटलासारखे फिरत आहेत," असं दिलीप वळसे पाटलांनी म्हटलं आहे. तसंच कार्यकर्त्यांकडून मंत्रिपद मिळायला हवं, अशी मागणी केली जाऊ लागल्यानंतर वळसे पाटील काहीसे गंभीर झाल्याचं पाहायला मिळालं. "मंत्रिपद काय म्हणून मागू? १५०० मतांनी निवडून आलोय म्हणून?" असा प्रतिसवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.
दिलीप वळसे पाटलांचा राजकीय प्रवास
आंबेगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी दिलीप वळसे पाटील यांनी सलग आठव्यांदा विजय मिळवला आहे. वळसे पाटील यांना मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९० साली ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यावेळी त्यांना विधिमंडळ अंदाज समितीचे प्रमुख करण्यात आले होते. १९९७-९८ साली विधानसभेतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ या पुरस्काराने वळसे पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर १९९९ साली त्यांना सर्वप्रथम मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर उच्च व तंत्र शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली. २००२ साली उच्च व तंत्र शिक्षण खात्याबरोबरच ऊर्जा खात्याची जबाबदारी आली.
२००३ साली ऊर्जा व तंत्र शिक्षण खात्याचे ते मंत्री होते. २००८ साली ते वित्त व नियोजन खात्याचे मंत्री होते. २००९ साली महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी प्रभावी कामकाज केले. या काळात विधानमंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे, यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. राज्यात विविध मंत्रिपदे सांभाळत असताना वळसे पाटील यांनी कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना त्यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.