मिलिंद कांबळे, पिंपरी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी शहरातून गेलेल्या तीन बालकांना शनिवारी झालेल्या भूकंपामुळे माघारी फिरण्याची वेळ आली आहे. १२ व १३ वयोगटातील हे नवोदित गिर्यारोहक सुरक्षित असून, रविवारी दिवसभर परतीच्या मार्गासाठी विमानाची वाट पाहत आहेत. यामुळे त्यांचे एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेचे स्वप्न भंगले आहे. गांधीनगर, चिंचवड येथील १३ वर्षांची शरयू मिरजकर, निगडीतील याच वयाची श्वेता भोसले आणि चिंचवड स्टेशन येथील १२ वर्षांचा स्मित सफारिया या तिघांसह एकूण ८ जणांचे पथक पुण्यातील गिरिप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून कांठमाडू , नेपाळ येथे गेले होते. माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेत ते सहभागी होणार होते. काठमांडूत ते शनिवारी सकाळी अकराला विमानाने पोहोचले आणि तासाभरात भूकंपाच्या हादऱ्याने नेपाळवर नैसर्गिक आपत्ती कोसळली. यापूर्वी त्यांच्याशी पालकांनी मोबाईलवरून संवाद साधला होता. सुखरूपपणे काठमांडूला पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी पहाटे दोनच्या विमानाने मुंबई येथून पालकांनी या तिघांना शुभेच्छा देत निरोप दिला होता. तेथून येऊन ते घरी झोपले होते. दुपारी बारा- साडेबाराच्या सुमारास शरयूचे वडील गणेश मिरजकर यांना मित्राचा फोन आला. त्यांनी नेपाळमध्ये भूकंप झाल्याची खबर दिली. ताबडतोब शरयूशी संपर्क साधला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही तो होत नव्हता. अखेर त्यांच्याशी संपर्क झाला. जवळच्या विमानतळाजवळील हॉटेलबाहेर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम केला. ते विमानाची वाट पाहत विमानतळावर आहेत, असे मिरजकर यांनी सांगितले. शरयू हिने गेल्या वर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प केला होता. त्याचवेळी तिने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प करण्याचे निश्चित केले होते. नशीब बलवत्तर असल्याने बेस कॅम्पवर जाण्यापूर्वीच ही घटना घडली. यंदा कॅम्प करता न आल्याने ते निराश झाले असले, तरी पुन्हा नव्या दम्याने गिर्यारोहण करणार असल्याचा विश्वास मिरजकर यांनी व्यक्त केला.
नवोदित गिर्यारोहक मुलांचे स्वप्न भंगले
By admin | Published: April 27, 2015 4:56 AM