लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: पारगाव तर्फे खेड गावच्या हद्दीत असलेल्या डोंगराला वणवा लागला होता. दुपारपासून आग पसरत गेली. मात्र हा वणवा विझवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. रात्री बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत तीन तास परिश्रम घेऊन ही आग विझवली. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत राखून ठेवलेल्या गायरानाला अज्ञातांनी आग लावली. गायरानाचे गवत वाळलेले असल्याने आगीचा डोंब उसळला. आगीचे मोठमोठे लोट पेट घेत होते. तशी ही आग दुपारीच लागली असल्याचे सांगितले जाते. मात्र, याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. अक्षय मनकर हा तरुण पारगाव येथे राहतो. मंचर येथून पारगाव येथे जात असताना त्याला पेठ गावच्या हद्दीतच डोंगरावरील आग दिसली. क्षणाचाही विलंब न करता अक्षय मानकर याने सहकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली. अक्षय व त्याच्या सहकाऱ्यांनी गायरानाकडे धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तब्बल ३ तासांनी संपूर्ण आग त्यांनी विझवली. या कामात पारगावचे बजंरग दलाचे कार्यकर्ते अक्षय मनकर, अविनाश मनकर, संकेत ढोकरे, साहिल निघोट, प्रथमेश भोर तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
चौकट
अलीकडच्या काळात वाळलेले माळरानावरचे गवत पेटवल्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात चांगले गवत उगवते. कारण जमीन भाजून निघते असा गैरसमज लोकांमध्ये आहे. किंवा काही समाजकंटकाकडून आगी लावण्याचे जाणूनबुजून प्रयत्न होतात. परंतु आग लावल्याने गवत तर जळतेच पण गवताबरोबर झाडे, बी पण जळते. मग पुढच्यावेळी गवत कसे येणार. वनविभाग आगी लावू नये याबाबत वारंवार जागृतता करते. तरीही खोडसाळपणे कुठे ना कुठे कुणीतरी आग लावतो. या आगीमध्ये झाडे, गवत तर जळतातच, परंतु मुंग्या, पक्षी, जंगली प्राणी, साप, बेडूक होरपळून निघतात.
भविष्यात येणारी संकटे टाळण्यासाठी तरुणांमध्ये निसर्ग जोपासण्याची भावना जागृत होताना दिसत आहे. पारगाव येथील तरुणांनी जे काम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.