थेऊर : आळंदी म्हातोबा गावातील डोंगराला गुरुवारी अचानक आग लागली. ही आग वाढत असल्याने ग्रामस्थ व प्रशासन चिंतेत होते. ग्रामस्थांच्या तसेच प्रशासनाच्या सहकार्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अखेर यश आले.
आळंदी म्हातोबा गावाच्या बाजूने असणारे डोंगर पावसाळ्यात हिरवळीने नेहमीच नटलेले असतात. स्थानिक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्याची व्यवस्था या डोंगरामुळे पूर्ण होत असते. परंतु काल दुपारी अचानक समाजकंटकांनी येथे आग लावली. पाहता पाहता संपूर्ण डोंगरावर आगीचे लोळ पाहायला मिळाले. डोंगरावर चरायला गेलेली जनावरे गावाच्या दिशेने पळू लागली. गावच्या सरपंच सोनाली जवळकर, उपसरपंच श्रीहरी काळभोर व इतर सदस्यांनी तरुणांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु थोड्याच वेळात आगीने संपूर्ण डोंगर व्यापला होता. सामाजिक कार्यकर्ते तुषार जवळकर यांनी वनविभाग व अग्निशामक दलाला याबाबत कल्पना देताच अग्निशामक दलाच्या गाड्या हजर झाल्या. गावातील तरुणांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्यात आले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी गौरी तेलंग, गावकामगार तलाठी कणींचे व वनविभागाचे अधिकारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.