लोकमत न्यूज नेटवर्क
राजेगाव : खानवटे (ता.दौंड) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी दौंड, इंदापूर, करमाळा आणि कर्जतच्या महसूल पथकाने जिलेटीनच्या साह्याने स्फोट करून १५ बोटी पाण्यात बुडवल्या.‘लोकमत’ने (दि.२५) रोजी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तहसीलदार विवेक साळुंके यांनी चार तालुक्यातील महसूल प्रशासन मिळून संयुक्त कारवाई करणार असल्याचे लोकमतला बोलताना सांगितले होते. तरीही वाळू तस्करांनी काहीही बोध न घेता अवैध वाळूउपसा राजरोसपणे चालू ठेवला होता.कारवाई खानवटे (ता. दौंड), कर्जत तालुक्यातील औटेवाडी, इंदापूर तालुक्यातील डिकसळ आणि करमाळा तालुक्यातील कात्रज या गावाच्या हद्दीत करण्यात आली.खानवटे गावाला दौंड, इंदापूर करमाळा व कर्जत या चारही तालुक्यांना भीमा नदीचे मोठे पात्र लाभल्याने तालुक्यांच्या हद्दीचा मोठा फायदा आजपर्र्यंत येथील वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर घेतला आहे. भीमा नदीच्या पात्रात असंख्य वाळूउपशाच्या बोटी राजरोसपणे वाळूचा उपसा करत असताना त्यांना कशाचेच भय नसल्याचे त्यांच्या धाडासावरून दिसते. भीमा नदी पात्रात राजरोसपणे सुरु असलेल्या वाळू उपशावर दौंड, इंदापूर, करमाळा व कर्जतच्या महसूल पथकाने खानवटे येथे सर्वात मोठी कारवाई करून भीमेतील वाळू तस्करांना मोठा धक्का दिला आहे. महसूलच्या या कारवाईत चारही तालुक्याच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी सुमारे १८ बोटींवर कारवाई करण्यात आली.या कारवाईत दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे, कर्जतचे तहसीलदार किरण पाटील, इंदापूर आणि करमाळा तालुक्याचे नायब तहसीलदार, चारही तालुक्यातील मंडल अधिकारी, गावकामगार तलाठ्यांनी सहभाग घेतला होता तर ही कारवाई संयुक्तरित्या पार पाडण्यासाठी दौंड इंदापूर, करमाळा व कर्जत या चारही तालुक्याचे तसीलदार तसेच महसूलचे कर्मचारी सहभागी झाले होते. भीमेतील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याने या तस्करांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते ग्र्रामस्थांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. यातून वाळूउपसा करणाऱ्यांनाही मोठा धडा मिळाला आहे. 1 भीमा नदी पात्रातील दौंड तालुक्यातील खानवटे या परिसरातील ही कारवाई झाली. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत हा कारवाईचा धडाका सुरू होता. ही कारवाई सर्वांत मोठी कारवाई असल्याचे समजते. 2गेली अनेक महिन्यांपासून भीमा पात्रात अवाढव्य बोटी चारही तालुक्यांच्या हद्दीतील वाळूचे साठे घशात घालतच होत्या. कारवाई करत असताना चारही तालुक्यातील महसूलचे अधिकारी असल्याने या वेळी या वाळूतस्करांना हद्दीचा फायदा घेता आला नाही; मात्र लिलाव होण्याअगोदरच भीमेतील सर्व वाळूसाठे हे तस्कर निकामी करत आहेत. 3या कारवाईमुळे आता वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही संयुक्त कारवाई शासनाच्या तसेच शेतकरी वर्गाच्या हिताची ठरलेली आहे. या कारवाईत दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे याच्या पथकाने १५ बोटी नष्ट केल्या.संयुक्त कारवाईचा निर्धारभीमा नदीच्या पात्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळूमाफियांना चाफ देण्यासाठी भविष्यात दौंड, इंदापूर, करमाळा, आणि कर्जतच्या महसूल पथकाची संयुक्त कारवाई कायम सुरु ठेवण्याचा निर्धार महसूल खात्याने घेतला आहे. - विवेक साळुंके, तहसीलदार, दौंड