इंदापूर : तहसीलदार वर्षा लांडगे व महसूल विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी (दि. ३०) उजनी पाणलोट क्षेत्रातील पळसदेव, डिकसळ भागातील नदीपात्रात चालणाऱ्या बेकायदेशीर वाळूउपसा व्यवसायावर हल्लाबोल केला. १ कोटी १५ लाख रुपये किमतीच्या २३ बोटी जिलेटिनच्या स्फोटात उद्ध्वस्त करून टाकल्या. वाळू चोरून घेऊन जाणारे तीन ट्रकही पकडले. सकाळी सात वाजता कारवाईस सुरुवात झाली. तहसीलदार वर्षा लांडगे यांच्यासह मंडलाधिकारी संतोष अनगरे, अजित पाटील, मदन भिसे, रवींद्र पारधी व इतर महसूल कर्मचारी, सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे, करमाळ्याचे मंडलाधिकारी, तलाठी कारवाईत सहभागी झाले होते. पळसदेव येथे १५ बोटी तर डिकसळ येथे ८ बोटी जिलेटिनचा साहाय्याने स्फोट करून उद्ध्वस्त करण्यात आल्या. (वार्ताहर)देऊळगावराजे : पेडगाव (ता. दौंड) परिसरातील शितोळे वस्तीजवळ वाळूचोरी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदार उत्तमराव दिघे यांना दिली होती. त्यानुसार दिघे यांनी पथक नेमून कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या पथकामध्ये संजय स्वामी, गुलाब हुसेन शेख, अभिमन्यू जाधव सहभागी झाले होते. पथक पेडगाव येथे भीमा नदीपात्रात गेले असता जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूचोरी होत असल्याचे निदर्शनास आले. अंदाजे ३५0 ब्रास वाळूचोरी झाली असून, त्याची किमत पाच लाख ५५ हजार आहे. पथक नदीपात्रात जेसीबी व ट्रॅक्टरचे रजिस्टर नंबर घेत असताना सहा जेसीबी व सहा ट्रॅक्टर संगनमताने पळवून नेण्यात आले. दत्तात्रय बापू गायकवाड, शिवाजी विलास शितोळे, बापू कांतीलाल खेडकर, दीपक शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही), मुक्तार मैनुद्दीन काजी यांच्या विरोधात दौंड पोलस स्टेशनमध्ये वाळूचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेडगावचे तलाठी संतोष इडुळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
वाळूउपसा करणाऱ्या २३ बोटी उद्ध्वस्त
By admin | Published: May 31, 2016 2:10 AM