देऊळगावराजे : शिरापूर व पेडगाव येथे भीमा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपसा करणाऱ्या सहा बोटींना महसूल कर्मचाऱ्यांनी जलसमाधी दिली. मंगळवारी श्रीगोंदा आणि पुणे जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली. यामुळे या परिसरातील वाळूमाफियांना दणका बसला आहे. शिरापूर आणि पेडगाव येथील भीमा नदीपात्रात बेसुमार वाळूउपसा होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिली होती. परंतु प्रत्येक वेळी कारवाई करण्यासाठी गेल्यावर वाळूचोर कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांतील हद्दीत पळून जात होते. त्यामुळे कारवाई करण्यात अडचण येत होती. त्यामुळे श्रीगोंद्याच्या तहसीलदार वंदना करमाळे व त्याच्या सोबत दहा ते बारा कर्मचारी सोबत घेऊन कारवाई करण्यासाठी आले. कर्जत तालुक्याचे तहसीलदार किरण पाटील व त्यांच्या बरोबर दहा कर्मचारी मिळून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. दौंडचे तहसीलदार विवेक सांळुखे यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सर्वच महसूलचे कर्मचारी तलाठी व सर्कल यांचे पथक तयार केले. यामध्ये तहसीलदारसह तीस कर्मचारी या कारवाईत सामील होते. दौंड, कर्जत आणि श्रीगोंदा येथील सर्व कर्मचारी मिळून अंदाजे पन्नास ते पंचावन्न कर्मचारी बरोबर घेऊन ही संयुक्त कारवाई करण्यात आली.शिरापूर आणि पेडगाव येथील सहा फायबर व एका यांत्रिक बोटीला जलसमाधी देण्यात आली. ही कारवाई संध्याकाळपर्यंत चालली होती. या वेळी वाळूचोरांचे अंदाजे वीस ते बावीस लाखांचे नुकसान करण्यात आले. या सर्व यांत्रिक बोटी व वाळू साठवण्याचे फायबर नदीच्या मध्यभागी नेऊन जिलेटिनच्या साह्याने फोडण्यात आल्या. त्यामुळे वाळूचोरांना चांगलाच धसका बसला आहे. परंतु, वाळूचोरांना कारवाईची माहिती मिळताच वाळूचोर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत दौंडचे तहसीलदार विवेक साळुंखे, कर्जतचे तहसीलदार किरण पाटील, श्रीगोंद्याचे तहसीलदार वंदना करमाळे, देऊळगावचे सर्कल संजय स्वामी, भानुदास येडे, प्रकाश भोंडवे, मोहन कांबळे, शिरापूरचे तलाठी बालाजी जाधव, संतोष येडुळे कर्मचारी कारवाईत सहभागी होते.
वाळूउपशाच्या सहा बोटी उद्ध्वस्त
By admin | Published: November 09, 2016 2:33 AM