वाघोली (ता. हवेली) येथील केसनंद रस्त्यालगत असणारी भूमिगत वाहिनी अज्ञांताकडून खोद काम करताना सोमवार (दि. ११ मे) रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान तोडण्यात आली. त्यामुळे वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी आदी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा खंडित होताच हडपसर विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमित भरते, वाघोली महावितरण कार्यालयाचे सहा. अभियंता गणेश श्रीखंडे व कर्मचारी यांनी तत्काळ वाघोलीतील बराचसा भाग वेगळ्या विद्युत वाहिनीला जोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. परंतु मांजरी, आव्हाळवाडी हा भाग केबल दुरुस्ती झाल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांनी युद्धपातळीवर काम करून रात्री पाऊणे नऊच्या सुमारास सुरळीत केला. त्यानंतर पुरवठा खंडित असलेला उर्वरित भाग रात्री साडेनऊ वाजता सुरळीत करण्यात आला. वारंवार असे प्रकार घडत असल्यामुळे विद्युत महावितरणसह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दरम्यान, वाघोली व परिसरात सद्य:स्थितीत काही रस्त्यालगत कामे चालू आहेत. बऱ्याचवेळा खोदकाम करताना विद्युत वाहिन्या तोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो, अशावेळी विद्युत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांचा काही दोष नसताना देखील ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
काही अज्ञातांकडून भूमिगत असणाऱ्या विद्युत वाहिनीची नासधूस करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांकडून महावितरणला दोष देण्यात येतो. अज्ञातांकडून विद्युत वाहिन्यांची नासधूस होत असेल तर सुज्ञ नागरिकांनी जागृत राहणे गरजेचे आहे. - अमित भरते (उपकार्यकारी अभियंता, हडपसर विभाग)
१३ आव्हाळीवाडी
१३ आव्हाळवाडी १
जेसीबी साह्याने विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम.
अज्ञातांकडून केबलची करण्यात आलेली नासधूस.