कर्वेनगर : पोलीस निरीक्षकाचा गणवेश परिधान केलेला एक अधिकारी आणि त्याचा एक वाहतूक कर्मचारी वाहनचालकांना अडवून पैसे लाटत होते. या अधिका-याला यापुर्वी कधीच पाहिले नाही, त्यामुळे शंका आलेल्या सजग नागरिकाने पोलीसांना फोन केला आणि हा तोतया निरीक्षक त्याच्या साथीदारासह पोलीसांच्या जाळ्यात अडकला. राहुल मनोहर नाईकवडे (वय ३०, रा. राजे शिवराय मित्र मंडळ, किष्किंदानगर कोथरूड) आणि अनिल राजेंद्र सुकळे (रा. हिंगणे होम कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सरतापे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी तातडीने एक वाहतूक पोलीस घटनास्थळी पाठवला. या कर्मचा-याने त्या तोतया अधिका-याकडे चौकशी केल्यावर उलट त्यालाच दमात घेतले. वरिष्ठ अधिका-यांशी कसे बोलतात हे समजत नाही का असे म्हणून दटावल्यावर त्या कर्मचा-याने पुन्हा सरतापेंना फोन केला. मग सरतापे स्वत:च घटनास्थळी गेले. त्याचा गणवेश पाहून त्यांनीही तो अधिकारी असल्यासारखे वाटले. त्यांनी नायकवाडेकडे चौकशी केली असता त्याने आपण खडकी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक असल्याचे सांगितले. पद उपनिरीक्षकाचे आणि गणवेश पोलीस निरीक्षकाचा हा विरोधाभास त्यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन मदत मागवली. वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, तनपुरे, तांबडे, अरविंद पाटील, काकडे भागकर, कांबळे घटनास्थळी पोचले. त्यांनी नायकवाडे आणि सुकळे या दोघांना ताब्यात घेतले. (वार्ताहर)३०० रुपयांत तडजोड४बुधवारी दुपारी आरएलडी महाविद्यालयात शिकणारा अभिजीत कांबळे (वय २४) हा तरुण त्याच्या मित्रासह बावधनकडे जात होता. त्यावेळी नायकवाडे रिक्षात बसलेला होता. तर त्याचा सहकारी सुकळे वाहनचालकांना अडवून हेल्मेट, वाहन परवान्याबाबत विचारणा करीत होता. कोणत्याही प्रकारची पावती न देता एक हजारांचा दंड सांगून ३०० रुपयांत तडजोड करुन वाहनचालकांना सोडत होता.