पुणे : ‘कितने बाजू कितने दम सुनले दुश्मन ध्यान से, हारेंगे ना हम बाजी जितेंगे हम शान से...’ या गाण्याप्रमाणे कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही, असा पवित्रा ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी घेतला आहे. मोडलेली ‘प्रश्नचिन्हा’ची प्रतिकृती पुन्हा उभारून ‘गांधीगिरी’ने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सोमवारी स्पष्ट केले.‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या ३७व्या दिवशी संस्थेच्या आवारात गोंधळ घालण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. आंदोलनाचे प्रतीक असलेली ‘एफटीआयआय’च्या प्रवेशद्वाराजवळील प्रश्नचिन्हाची प्रतिकृती आणि दगड ठेवलेल्या खुर्चीची मोडतोड केल्याचा प्रकार दहा-बारा तरुणांकडून रविवारी रात्री करण्यात आला. या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही मुस्कटदाबीची नांदी असली, तरी विद्यार्थ्यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. माघार घ्यायची नाही असा निर्धार केला आहे.हे प्रकार होतील याची खात्री असल्याने मुन्नाभाई एमबीबीएसच्या ‘गांधीगिरी’ स्टाइलने पुन्हा त्या प्रतिकृती उभारण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. जितक्या वेळा त्या प्रतिकृतींची मोडतोड केली जाईल, तितक्या वेळा त्या पुन्हा उभारल्या जातील, असे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांकडून देण्यात आले. दरम्यान, हा प्रकार संस्थेच्या आवाराबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याची तक्रार कोण करणार, हा मुळात प्रश्न आहे. या मोडतोडी प्रकरणाविरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी दिले. हा अधिकार विद्यार्थ्यांचा नव्हे, संचालकांचा आहे असे स्पष्ट करीत संचालकांच्याच कोर्टात विद्यार्थ्यांनी चेंडू टाकला आहे. (प्रतिनिधी)
आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
By admin | Published: July 21, 2015 3:07 AM