पुणे : भटक्या कुत्र्यांना अनेक प्राणिमित्र आणि नागरिक खाण्यासाठी रस्त्यावर कुठेही टाकतात. त्यामुळे अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यामधून लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना कुत्री चावण्याचे प्रकारही घडतात. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी ठराविक ठिकाणे (फीडिंग पॉईंट) निश्चित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्बन सेलच्या वतीने पालिकेच्या आरोग्य प्रमुखांकडे करण्यात आली आहे.
सेलच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्यासोबत सेलचे शहराध्यक्ष नितीन कदम, मनाली पवार, नितीश रे यांनी डॉ. आशिष भारती यांची भेट घेतली. याबाबत माहिती देताना खा. चव्हाण म्हणाल्या की, भटकी कुत्री आणि पाळीव जनावरांचा त्रास नागरिकांना होतो. हा उपद्रव कमी करणे आवश्यक आहे. तर, कदम म्हणाले की, पाळीव जनावरांच्या संदर्भात केंद्र सरकारने लागू केलेल्या नियमावलीचे पालन केले जात नाही. मोकाट जनावरांचा नागरिकांना उपद्रव होणार नाही यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. कुत्र्यांची नसबंदी केली जावी. नसबंदी करताना आवश्यक खबरदारी घेणे आणि नियमांचे पालन केले जावे, अशी मागणी केल्याचे कदम म्हणाले.