पुणे : शहरात मोठी बिझनेस इंडस्ट्री बनलेले स्पर्धा परीक्षा क्लासेस हे केवळ शॉप अॅक्ट लायसेन्सवर चालविले जात आहेत. या क्लासेस चालविणाऱ्यांची नोंदणी बंधनकारक करणे, क्लासच्या दर्जानुसार त्यांचे शुल्क निश्चित करणे, शिक्षकांची अर्हता ठरविणे, आॅडिट होणे आदी नियमावलीची निश्चिती केली जावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.स्पर्धा परीक्षा तसेच इतर क्लासेसवर शासनाचे अथवा शिक्षण विभागाचे कोणतेही नियंत्रण नाही. विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा, इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेज यांच्या अवाजवी फीला वेसण घालण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली. त्यांची फीवाढ ठरविण्यासाठी निश्चित नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याच अंतर्गत स्पर्धा परीक्षा क्लासेसचाही समावेश होण्याची आवश्यक आहे.शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक विवेक वेलणकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘स्पर्धा परीक्षा तसेच इतरही क्लासेस या मोठी इंडस्ट्री बनलेल्या आहेत. त्यांच्या सेवेचे शुल्क ठरविण्यासाठी निश्चित प्रक्रिया ठरविली पाहिजे. क्लासेचा दर्जा, तेथील शिक्षकांची पात्रता आदींचा विचार करून शुल्क निश्चित करून दिले जावे. त्यासाठी क्लासेसना फी रेग्युलेशन अॅक्टखाली आणावे लागेल.’’शॉप अॅक्टच्या आधारे उघडण्यात आलेले क्लासेस राज्यभरात आपल्या असंख्य शाखा उघडून तिथे अनेक बॅचेस चालवीत आहेत. क्लास हे शॉप अॅक्टच्या आधारे चालवायला ते दुकान नाही, तिथे कुठले प्रॉडक्ट विकले जात नाही. शाळा, महाविद्यालयांप्रमाणे तिथे ज्ञानदानाचे काम केले जाते. त्यामुळे शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत सर्व क्लासेसची नोंदणी बंधनकारक करावी. क्लासेसमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची अर्हता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. लाखो रुपये फी घेणारे क्लासचालक त्यांच्याच जुन्या विद्यार्थ्यांला क्लासचा शिक्षक बनवितात. शाळा, महाविद्यालयांप्रमाणे त्यासाठीची अर्हता ठरवून दिली जावी, आदी मागण्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे केल्या आहेत.(प्रतिनिधी)
क्लासेससाठी नियमावली करावी निश्चित
By admin | Published: April 17, 2017 6:29 AM