पुणे : कला, संस्कृती, नाट्य, संगीत यांची जोपासना करण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात शासन कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि सांस्कृतिक खात्याकडून विविध प्रश्नांना गती देण्याचे काम नक्कीच केले जाईल, अशी ग्वाही देत राज्याचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी ’हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल. याबद्दल कुणीही मनात शंका आणू नये असा विश्वासही व्यक्त केला.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘पिफ’चा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पुण्यातील त्यांचा पहिला कार्यक्रम होता. या वेळी ’सीआयडी’सारख्या हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीच्या ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक अॅण्ड साउंड’ने सन्मानित करण्यात आले. खन्ना या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित न राहू शकल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.याप्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महापौर मुरलीधर मोहोळ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे संचालक भूपेंद्र कँथोला, अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधी कटिबद्ध- सांस्कृतिक मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 4:09 AM