इंदापूर : हे देवा गणराया, राज्यावर आलेल्या कोरोना महामारीतून राज्यातील जनतेला तत्काळ मुक्त कर, शेतकरी सुखी आनंदात राहू दे... असे साकडे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गणरायाला घातले.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुटुंबीयांसमवेत अत्यंत साधेपणाने गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व सारिका भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी भरणे म्हणाले की, राज्य अतिशय वेगळ्या संकटात सापडले आहे. महाआघाडीचे राज्य सरकार मात्र या संकटातून मार्ग काढण्यासाठी कटिबद्ध राहिले आहे. शेतकऱ्यांसमोर व नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत. मात्र ठोस उपाययोजना सरकारच्या माध्यमातून सुरू असल्यामुळे आदर्श राज्य निर्माण होण्याकडे वाटचाल वेगाने सुरू आहे. कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी, शेतकऱ्यांनी गणेशोत्सव आपल्या राहत्या घरात कुटुंबासमवेत साजरा करावा, कोठेही गर्दी करू नये, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
--
फोटो क्रमांक : १० इंदापूर भरणे गणेशोत्सव
फोटो ओळ : इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे.