लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जगद्गुरू संत तुकाराममहाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालख्या पुण्यात विसावल्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. तुकाराममहाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर तर ज्ञानेश्वरमहाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली. एखाद्या इमारतीच्या पार्किंगमध्ये रंगलेला कीर्तनसोहळा, ट्रकजवळ बसलेली अभंगांची बैठक, रस्त्यावर चाललेला राम कृष्ण हरि, माऊलींचा जयघोष कानावर पडला. हा सर्व परिसर वारकरी बांधव व दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. या ठिकाणी खाद्यपदार्थांपासून ते लहान मुलांची खेळणी, स्वयंपाकघरातील वस्तू, महिलांची सौंदर्यप्रसाधने, दागिने आदी वस्तूंच्या दुकानांनी परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. भाविकांनी दर्शनासह खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला व नानाविध वस्तूंच्या खरेदीतही महिला वर्ग आघाडीवर असल्याचे दिसले. तरुण वर्ग पालखीच्या रथासह घोडे, वारकरी यांच्यासोबत सेल्फी काढण्यात व्यस्त दिसले. दर्शनासाठी कुठेही व्हीआयपी पासची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तरीही मध्ये काही वेळा पोलिसांनी ओळखीच्या लोकांना सोडण्याचा प्रकारही नजरेस पडला. दर्शनासाठी पुरुषांची व महिलांची रांग वेगळी करण्यात आली होती. पोलिसांकडूनही दर्शनाच्या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत होती.
भक्तिरसात पुणेकर चिंब
By admin | Published: June 20, 2017 7:13 AM