- किरण शिंदे
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या गणेश मारणे याला बुधवारी सायंकाळी पुणे पोलिसांनी अटक केली. शरद मोहोळचा खून झाल्यानंतर तो पसार झाला होता. फरार काळात गणेश मारणे याने पाच राज्यात प्रवास केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, हैदराबाद या राज्यात त्याने प्रवास केला. या पाचही राज्यात त्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन देवदर्शन केले. आणि विशेष म्हणजे या पाचही राज्यात तो रेल्वेने फिरला. केरळवरून तो पुण्यात येण्यासाठी नाशिकला उतरला. तिथून त्याने पुण्यात येण्यासाठी ओला गाडी बुक केली होती. मात्र ती गाडी सुद्धा त्याने नंतर रद्द केली होती. मात्र ओला गाडी बुक केल्यामुळे गणेश मारणे फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
शरद मोहोळ खून प्रकरणात पोलीस आपल्या शोधात असल्याचे समजल्यानंतर गणेश मारणे अचानक गायब झाला. या काळात त्याने वाई, तुळजापूर, निपाणी, बंगळूर, हैदराबाद, गुजरात, केरळची राजधानी त्रिवेंद्रम, जळगाव ते नाशिक असा प्रवास केला. कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश मारणे वकिलाची भेट घेण्यासाठी लोणावळा येथे जाणार होता. नाशिकला उतरल्यानंतर लोणावळा जाण्यासाठी त्यांनी ओला गाडी बुक केली होती. मात्र नंतर ही ओला गाडी त्यांनी रद्द केली. पोलिसांना त्याचा नेमका हा नंबर ट्रेस झाला आणि त्याचा ठावठिकाणा लागला. ओला गाडी रद्द केल्यानंतर तो खाजगी वाहनाने लोणावळ्याच्या दिशेने निघाला होता. दरम्यान ओला गाडी रद्द केल्यानंतर गणेश मारणे खाजगी वाहनाने प्रवास करू शकतो असा कयास पोलिसांनी बांधला. त्यांनी नाशिक-पुणे मार्गावरील खाजगी गाड्या तपासण्यास सुरुवात केली होती. या गाड्या तपासत असतानाच एका गाडीत पोलिसांना तो आढळला. लोणावळा येथे पोहोचण्याआधी म्हणजेच नाशिक फाटा परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली.
तुळजापुरात देवदर्शन, २ दिवस मुक्कामही
फरार असताना गणेश मारणे ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणी त्याने देवदर्शन केले. सुरुवातीला त्याने तुळजापूर येथील मंदिरात दर्शन घेतले आणि अभिषेकही केला. या ठिकाणी दोन दिवस मुक्काम केल्यानंतर तो पुढील प्रवासाला निघाला. यासोबतच तो ज्या ज्या ठिकाणी मुक्कामी राहिला त्या त्या ठिकाणच्या प्रसिद्ध मंदिरात जाऊन त्याने दर्शन घेत अभिषेक केला. फरार काळात त्याने वापरलेल्या दोन चार चाकी गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शेलार अन् मारणेच्या हद्दीत मोहोळचा हस्तक्षेप
शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे हाच सूत्रधार असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तुरुंगातून सुटून आल्यानंतर शरद मोहोळने पुणे शहरात पुन्हा आपले बस्तान बसवण्यास सुरुवात केली होती. पुणे शहर आणि परिसरात त्याचा हस्तक्षेप वाढला होता. तर मारणे आणि शेलार यांच्या टोळ्यांनी आधीच आपापली कार्यक्षेत्रे वाटून घेतली होती. त्या त्या भागात त्यांची चलती होती. मात्र शरद मोहोळच्या हस्तक्षेपानंतर त्यांच्यात पुन्हा वाद होऊ लागले. खून होण्याच्या काही दिवस आधीच शरद मोहोळने गणेश मारणेच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण केली होती. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. मात्र गणेश मारणेने ड्रायव्हरला तक्रार देण्यापासून रोखले होते. आपण लवकरच मारहाणीचा बदला घेऊ असेही त्याने ड्रायव्हरला सांगितले होते. आणि या घटनेनंतर चार ते पाच दिवसातच शरद मोहोळचा खून झाला.
शरद मोहोळची गणेश मारणेच्या ड्रायव्हरला मारहाणीचे निमित्त
याशिवाय शरद मोहोळ खून प्रकरणाला आणखीही बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहे. यामध्ये हिंजवडी परिसरातील एका टेंडरवरून मोहोळ आणि शेलार यांच्यात वाद झाले होते. याशिवाय मोहोळ खून प्रकरणातील आणखी एक आरोपी नामदेव कानगुडे याच्या मनात देखील शरद मोहोळ विषयी राग होता. मुळशीतील वेग्रे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मदतीसाठी नामदेव कानगुडे शरद मोहोळकडे गेला होता. त्यावेळी शरद मोहोळने अपमानित करून त्याला हाकलून दिले होते. अपमानित झालेला नामदेव कानगुडे नंतर गणेश मारणेकडे गेला होता. गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार या दोघांनी त्याला निवडणुकीसाठी मदत केली होती. मात्र त्याच्या मनात शरद मोहोळविषयी असलेल्या रागाचा फायदा मारणे आणि शेलार यांनी उचलला. त्यातूनच पुढे शरद मोहोळच्या हत्येचा कट रचला गेला आणि तो पूर्णत्वासही आणला गेला.