लोणावळा : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर 24 तास आप्तकालीन सेवा देणार्या देवदूत कामगारांना कंपनीकडून एप्रिल महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. पगाराच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आर्यन कंपनीकडून कोणताही समाधानकारक खुलासा देण्यात न आल्याने सोमवार (दि.१८) पासून 'देवदूत'चे 70 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सर्व कामगार सकाळपासून कुसगाव येथिल आयआरबी कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. दोन दिवसांपूर्वी या कामगारांनी मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकाम महामंडळ, आयआरबी कंपनी, महामार्ग पोलीस यांना दिले होते. मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते. खालापूर ते किवळे दरम्यान देवदूतच्या सर्व सुविधायुक्त चार गाड्या काम करतात. तीन शिफ्टमध्ये येथे 70 कामगार काम करतात. त्यांना मागील महिन्याचा पगार मिळालेला नाही. तसेच आर्यन कंपनीचा रस्ते विकास महामंडळासोबतचा करार फेब्रुवारी महिन्यात संपला असल्याने आम्ही नेमके कोणाच्या अधिपत्याखाली काम करत आहोत याची माहिती मिळावी, देवदूत टिमला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही सुरक्षा साधने दिलेली नाहीत, काही दुर्घटना घडल्यास कोणाचाही आरोग्य विमा नाही, टिमची दैनंदिन चहापाणी, राहण्याची व नाष्ट्याची विशेष सुविधा बंद करण्यात आली आहे. कामाची व पगाराची हमी नाही, मागील वर्षापासून पनवेल स्टेशनला लाईटची समस्या निर्माण झाली आहे ती अजुन सुटलेली नाही आदी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.
द्रुतगती मार्गावर 24 तास आपत्कालीन सेवा देणार्या 'देवदूत' यंत्रणेचे आजपासून कामबंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:42 PM
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर काही अपघात झाल्यास देवदूत यंत्रणा तात्काळ मदतीकरिता हजर असते.
ठळक मुद्देतीन शिफ्टमध्ये येथे 70 कामगार करतात काम