पुणे : जगात सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीसाठी महत्वपुर्ण असलेल्या दुर्बीण संचार व नियंत्रण प्रणाली (टेलिस्कोप मॅनेजर) विकसित करण्यात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राला (एनसीआरए) यश आले आहे. या संस्थेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समुहाने ही कामगिरी केली आहे. आॅस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे उभारण्यात येणाऱ्या या दुर्बिण प्रकल्पाच्या संगणक प्रणालीसाठी ही प्रणाली महत्वाची असून त्याशिवाय दुर्बिणाचा वापर करता येणार नाही. मानवी शरीरातील मेंदु व मज्जा संस्था ज्याप्रकारे काम करते त्याच पध्दतीने ‘टेलिस्कोप मॅनेजर’चे कार्य असेल. त्यामुळे या कामगिरीला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व प्राप्त झाले आहे.स्क्वेअर किलोमीटर एॅरे (एसकेए) प्रकल्प हा विविध देशांनी मिळून उभारण्यात येणारा जगातील सर्वात मोठा रेडिओ दुर्बीण प्रकल्प आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये स्थापन झालेल्या या आंतरराष्ट्रीय समूहामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील ‘एनसीआरए’ व पुण्यातीलच टीसीएस रिसर्च व इनोवेशन या भारतातील संस्थासह आॅस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, पोतुर्गाल, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथील विविध विविध संस्थांचा समावेश आहे. ‘एनसीआरए’च्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय समूहावर दुर्बिणीच्या मुख्य संगणक प्रणालासाठी संचार व नियंत्रण प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मागील साडे चार वर्षाच्या कालावधीमध्ये हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करून इंग्लंड येथील एस के ए संस्थेकडे ते सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी विविध गटांवर विविध कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये ‘एनसीआरए’ने पहिल्यांदा काम पुर्ण केल्याची माहिती संस्थेचे संचालक व ‘टेलिस्कोप मॅनेजर’ याआंतरराष्ट्रीय समुहाचे नेतृत्व करणारे प्रा. यशवंत गुप्ता यांनी शनिवारी दिली. यावेळी प्रा. योगेश वाडदेकर, डॉ. तीर्थंकर राय चौधरी यांच्यासह या प्रणालीसाठी काम केलेले विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.‘टेलीस्कोप मॅनेजर’ हा आंतरराष्ट्रीय समूह ‘एसकेए’ एकूण १२ आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी समूहांपैकी एक असून या सर्व समूहांमध्ये २० देशातील सुमारे ५०० शास्त्रज्ञ व अभियंते कार्यरत आहेत. या १२ समूहांपैकी ९ समूह दुर्बिणीसाठी लागणारे घटक यासाठी काम करीत असून उर्वरित ३ समूह दुर्बिणीच्या अद्ययावत उपकरण प्रणालींसाठी संशोधन करीत आहेत. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील समुहाने मागील चार ते साडे चार वर्षांच्या कालावधीमध्ये अतिशय क्लिष्ट व अत्याधुनिक अशा योजनाबद्ध संरचनेची निर्मिती केली आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांकडून एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये ही प्रणाली यशस्वी ठरली आहे. इतर समुहांचे कामही अंतिम टप्प्यात आले असल्याचे गुप्ता यांनी सांगितले................काय आहे एनसीआरए?‘एनसीआरए’ मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन होते. त्यामध्ये सक्रिय दीर्घिका, आंतरतारकीय माध्यम, पल्सार, विश्वनिर्मितीशास्त्र आणि विषेशत: रेडिओ खगोलशास्त्र आणि रेडिओ उपकरणशास्त्र यांचा समावेश आहे. ‘एनसीआरए’ ने खोडद येथे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती केली आहे. ही संस्था ‘एसकेए’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. २०१९ साली एसकेए प्रकल्प उभारणी मध्ये भारताची प्रमुख भुमिका असेल. संस्थेच्या जीएमआरटी रेडिओ दुर्बिणीस ‘एसकेए’ने ‘पथदर्शी’ म्हणून गौरव केला असून रेडिओ खगोल शास्त्रातील संशोधनासाठी जीएमआरटी प्रकल्पामुळे मोठी मदत होत आहे. ---------‘एस के ए’चाी प्रत्यक्ष उभारणी पुढील वर्षीपासून‘एसकेए’ हा प्रकल्प म्हणजे एक दुर्बीण नसून अनेक दुर्बिणींचा समूह आहे. ही रेडिओ दुर्बीण सध्याच्या इतर रेडिओ सुविधा पेक्षा २०० पटीने अधिक क्षमतेने आकाशातील घटकांचे संशोधन करू शकणार आहे. या प्रकल्पांतर्गत ३०० दुर्बिणी व सुमारे ३० हजार अँटेना दक्षिण आफ्रिका व आॅस्ट्रेलिया येथे उभारला जाणार आहे. ‘जीएमआरटी’पेक्षा हा प्रकल्प तब्बल ३० पटीने अधिक मोठा असणार आहे. त्यामुळे विश्वाबद्दलचे रहस्य, माहिती सखोलपणे अभ्यासणे, तसेच भौतिकशात्रातील मूलभूत सिद्धांत समजण्यास मदत होणार आहे. पुढील वर्षीपासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार असून २०२५ पर्यंत पुर्ण होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतासह १२ देशांचा समावेश आहे. ---------------------
सर्वात मोठ्या दुर्बिणीचे नियंत्रण करणारी प्रणाली विकसित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 6:08 PM
जगात सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीसाठी महत्वपुर्ण असलेल्या दुर्बीण संचार व नियंत्रण प्रणाली (टेलिस्कोप मॅनेजर) विकसित करण्यात पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राला (एनसीआरए) यश आले आहे.
ठळक मुद्देपुण्यातील संस्थेच्या नेतृत्वाखाली संशोधन जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) या मीटर तरंगलांबीतील जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीची निर्मिती ही रेडिओ दुर्बीण सध्याच्या रेडिओ सुविधापेक्षा २०० पटीने अधिक क्षमतेने आकाशातील घटकांचे संशोधन करू शकणार‘एनसीआरए’ मध्ये खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी यामधील अनेक विषयांवर संशोधन