प्रशांत ननवरे -बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र,याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलुन गेले आहेत. आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.
गेल्या पाच वर्षात ७ ऑगस्ट २०१५ पासून निलेश देखमुख,मंगेश चितळे,योगेश कडुसकर,किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलुन गेले आहेत.आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे.या पार्श्वभुमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो याचे संशोधन होण्याची गरज आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची,दर्जाची पाहणी करत आहेत. मात्र,सातत्याने बदलुन जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे पवारांच्या शहर विकासनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. नगरपरिषदेची व्हेंटिलेटरवर असणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सक्षम मुख्याधिकाऱ्याचीच गरज आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांची २१ जून २०२१ रोजी मुंबई येथे बदली झाली. त्यांचा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, ५० दिवस उलटून देखील बारामती नगरपालिकेला मुख्याधिकारी मिळालेले नाही. सध्या अमरावती महानगरपालिकेचे उपायुक्त रवी पवार यांच्या नावाची नवीन मुख्याधिकारी पदासाठी चर्चा आहे.
...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षाचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, जे कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.—————————————