बारामती : बारामती शहरातील दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. ‘स्वच्छ, सुंदर बारामती’चा डिंगोरा पिटणाऱ्या उदासीन नगरपालिका प्रशासनाच्या धोरणामुळे हे चित्र बदलण्यास तयार नाही. दलित वस्त्यांमधील नागरिक जीवन अक्षरश: कंठत आहेत. कमालीची दुर्गंधी, अस्वच्छता व मूलभूत सोयींचा अभाव हे वास्तव बारामतीतील दाखविल्या जाणाऱ्या विकासाची वास्तवातील दुसरी बाजूही स्पष्ट करणारे आहे. शासकीय इमारतींचे काम वेळेच्या अगोदर पूर्ण केले. मात्र, १२ वर्षांहून अधिक काळ झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतींचे काम अजून सुरू आहे. प्रशस्त शासकीय इमारती, चकाचक रस्ते, सर्व्हिस रोड, मोठ्या प्रमाणात केलेले वृक्षारोपण या माध्यमातून बारामती शहराचे चित्र रंगविण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात दलित वस्त्यांमध्ये उदासीनता आहे. सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, अशी विनवणी करून येथील रहिवासी थकले; मात्र नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही.शहरातील उघडा मारुती मंदिर प्रभागातील झोपडपट्टी सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीला बकालपणा आला आहे. इमारतीमधील स्वच्छतागृहाच्या पाईपची दुरवस्था झाली आहे. पाईप फुटलेले असल्याने सांडपाणी इमारतीच्या परिसरात साठते. सांडपाण्यामुळे या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. अस्वच्छतेचे प्रमाण अधिक असल्याने दलदलीत मोकाट जनावरे फिरतात. डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलांच्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. त्यामुळे राहिवाशांना सतत दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. ‘ई’ इमारतीमधील नागरिकांना नरपालिका प्रशासनाच्या वतीने पिण्याचे पाणी पुरविले जात नाही. बोअरचे पाणी पिण्याची वेळ या इमारतीमधील नागरिकांवर आली आहे. (प्रतिनिधी)
दलित वस्त्या विकासापासून कोसो दूर
By admin | Published: October 21, 2015 12:49 AM