कात्रज : कात्रजप्रमाणेच या प्रभागातही विकासाचे इंजिन आणणार आहे. येथील अर्धा भाग असलेला सुखसागरनगरचा परिसर दहा वर्षांपासून मी विकसित केलेला आहे. त्यामुळे मला दोन वेळा या भागातून निवडून देणारी जनताच कामाची पावती आहे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी व्यक्त केले.मनसेचे प्रभाग क्रमांक ३८चे उमेदवार मंगेश रासकर, शैला गुजर, शकुंतला वसंत मोरे, विकास बोडसिंग यांच्या प्रचारसभेत मोरे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘हे चारही उमेदवार माझ्या विकासाच्या रेल्वेला असणारी चार चाके आहेत. विकास करणे म्हणजे फक्त चांगले रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, कचरा नियोजन करणे नव्हे. विकास म्हणजे त्या भागाची ओळख जगाच्या नकाशावर उमटवून दाखविणे. आम्ही भूलथापा देणारे नाही. प्रत्येकाच्या स्वप्नातला प्रभाग घडवून दाखवू. कारण, आमच्याकडे इच्छाशक्ती आहे. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असून सुज्ञ मतदार विकासालाच पंसती देतील.’’सुखसागरनगर, राजीव गांधीनगर, बालाजीनगर या परिसरात पदयात्रा व कोपरासभा घेण्यात आल्या आहेत. या वेळी संजय मोरे, गुजरवाडीचे उपसरपंच दीपक गुजर, योगेश खैरे, जंयत गिरी, विकास नाना फाटे, विजय पायगुडे, अमोल तांबे, सचिन काटकर, अभिजित शिवगणे, अनिकेत खिरीड, अक्षय धुमाळ, मनीषा दीक्षित, मृणाल पटवर्धन, अंजली सुपेकर, शालन धुमाळ, शंकरराव शेलार, नितीन शेलार, विजय गुजर यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रभाग ३८मध्ये आणणार विकासाचे इंजिन
By admin | Published: February 16, 2017 3:23 AM