पुणे : खेड्यांचा विकास जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. पण, आजचा विकास हा निसर्ग आणि मानवतेच्या शोषणातून केला जात आहे. त्यातूनच प्रदूषण आणि तापमानवाढीच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गोष्टी रोखण्यासाठी दूरगामी विचारातूनच ‘वनराई’ निर्माण करण्याचा संदेश मोहन धारिया यांनी दिला होता. त्यासाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले. वेडं झाल्याशिवाय सामाजिक कार्य होत नाही, असे स्पष्ट करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’...अशी टिप्पणीही केली. ‘वनराई’चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांच्या ९० व्या जयंतीदिनी वनराई फाउंडेशनच्या वतीने लोकचळवळीचे अर्ध्वयू अण्णा हजारे यांना ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते शनिवारी ‘स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार, तसेच ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, हिरवळ संस्थेचे संस्थापक किशोर धारिया उपस्थित होते. पद्मश्री, पद्मभूषण यांसह अनेक पुरस्कार मिळाले, पण अण्णांच्या नावाने मिळालेल्या या पुरस्काराचा सर्वाधिक आनंद आहे, अशी भावना हजारे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘दूरगामी विचार करूनच धारियांनी वनराईची चळवळ सुरू केली. हीच चळवळ तापमानवाढीच्या संकटापासून वाचवू शकेल.’’ उल्हास पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. ४आदर्श गावाची संकल्पना स्पष्ट करताना, विकास करणे म्हणजे मोठ्या इमारती किंवा पक्के रस्ते बांधणे नव्हे, तर सामाजिक बांधिलकीची जाण असणारी माणसं उभी करून आदर्श गाव करणे आणि हेच काम अण्णांनी सुरू केले आहे. माणसं उभी करण्यासाठी नेतृत्व महत्त्वाचे आहे. ज्याचे चारित्र्य शुद्ध, नि:स्वार्थी विचार, त्यागी वृत्ती आहे, तोच माणूस परिवर्तन घडवू शकेल, याकडेही हजारे यांनी लक्ष वेधले. ४कुवळेकर म्हणाले,की आजचा धारियांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे सत्प्रवृत्तीचा पुरस्कार असून, तो अण्णा हजारे यांना दिला जातो म्हणजे सत्प्रवृत्तीच्या आविष्काराला दिला जात आहे.
मानवतेच्या शोषणातून झालेला विकास धोकादायक
By admin | Published: February 15, 2015 12:00 AM