पुणे : पालिकेच्या निवडणुकांना अवघे एक वर्ष शिल्लक राहिल्यानेच भाजपाकडून महापालिकेत नेत्यांच्या आढावा बैठका सुरु केल्या आहेत. निवडणुकांच्या तयारीला ‘विकासा’चे गोंडस नाव दिले जात असून, या दौऱ्यांमधून काहीही साध्य होणार नसल्याची टीका विरोधी पक्षांनी सुरु केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पालिकेमध्ये अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने समान पाणीपुरवठा, जायका, नदी सुधार प्रकल्प, समाविष्ट ११ गावांमधील मलनि:स्सारण प्रकल्प, चांदणी चौक उड्डाणपूल, नाला पूरनियंत्रण, वैद्यकीय महाविद्यालय आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीची प्रशासकीय चर्चा होण्यापेक्षा राजकीय चर्चाच अधिक झाली.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार गिरीश बापट उपस्थित नसल्याचीही चर्चा झाली. चार वर्षात महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात सपशेल अपयश आले असून फडणवीस यांच्या दौ-यामुळे प्रकल्पांना कितपत गती मिळेल हा प्रश्न आहे. प्रकल्पांना गती देण्यापेक्षा निवडणुकीची तयारी हाच मुख्य उद्देश असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
====
आगामी वर्षात निवडणुका आहेत. त्यादृष्टीने विरोधी पक्षनेत्यांचा दौरा झालेला आहे. पुणेकरांची काळजी असती तर चार वर्षात हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असते. ज्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला त्यातील बहुतांश प्रकल्प राष्ट्रवादीच्याच काळातील आहेत. हा केवळ दिखावा आहे. परंतु, यामुळे पुणेकर भुलणार नाहीत.
- दीपाली धुमाळ, विरोधी पक्षनेत्या
====
पालिकेत भाजपाची सत्ता असतानाही त्यांच्या प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि खासदारांना पालिकेत येऊन आढावा बैठक घ्यावी लागते हे दुर्दैवच म्हणावे लागेल. भाजपात सर्वकाही आलबेल नाही. चार वर्षात प्रकल्प पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी कोण घेणार?
- आबा बागुल, गटनेते, कॉंग्रेस
====
गेल्या चार वर्षात भाजपाला राज्यात सत्ता असूनही प्रकल्प मार्गी लावता आलेले नाहीत. विकासकामे नव्हे तर निवडणुका हाच अजेंडा आहे. पालिका-राज्य-केंद्रात सत्ता असताना जाहिरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली. शहराचा किती विकास झाला हे तपासण्यासाठी सल्लागार नेमण्याची गरज आहे. भाजपाचा आणि विकासाचा काहीही संबंध नाही.
- पृथ्वीराज सुतार, गटनेते, शिवसेना