लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) येत्या वर्षभरात तयार केला जाणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दिल्ली वगळता पीएमआरडीएचा विकास आराखडा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आराखडा असणार आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेणारा आणि शहराच्या गरजा लक्षा घेऊन तो तयार केला जाईल, असेही बापट यांनी या वेळी स्पष्ट केले.महाराष्ट्र प्रदेश नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कल ३२ नुसार पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार केला जाणार असल्याची घोषणा गिरीश बापट यांनी सोमवारी केली. याप्रसंगी पीएमआरडीएचे आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) किरण गित्ते आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, की अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यमान जमीन वापर नकाशा (ईएलयू मॅप) तयार केला जात असून येत्या ३१ जुलै रोजी त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी १० सें.मी. रिझोल्यूशनपर्यंत अचूकता असलेले हवाई छायाचित्रण घेतले आहे. पीएमआरडीमध्ये पुणे शहराव्यतिरिक्तची शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो होणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टशीप (पीपीपी) तत्त्वावर ही मेट्रो असेल. सहा आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी निधी लागणार आहे. पुणे महानगरपालिकेने निधी उभा केला तसाच या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य व पीपीपीमधून निधी उभा केला जाईल. पुणे मेट्रोला कॅबिनेटमधून मंजुरी मिळाली तशीच पीएमआरडीएच्या मेट्रोला पुढील काही दिवसांत मंजुरी मिळावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. डीपीमध्ये आठ ते नऊ तालुके असून महापालिका व नगरपालिका वगळता इतर भागाचा डीपी तयार केला जाईल.डीपीमधील जमिनीचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करावा याबाबतचा प्रस्ताव केवळ पीएमआरडीएकडून केला जाईल. कोणत्याही कंपनीकडे डीपीचे काम दिले जाणार नाही. त्यामुळे त्यात गोपनीयता राहील. तसेच डीपीसाठी स्वतंत्र प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट (पीएमयू) असेल. त्यासाठी सिंबायोसिस, अभियांत्रिकी व कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जाईल, असेही पीएमआरडीएचे किरण गित्ते यांनी सांगितले.
पीएमआरडीएचा विकास आराखडा वर्षभरात
By admin | Published: June 20, 2017 6:52 AM